रेश्मा जोशी यांच्या हस्ते उद्घाटन; पुस्तक प्रकाशनासह मान्यवरांचा सन्मान
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका आगरी समाज संघटना आणि आगरी साहित्य चळवळ यांच्या माध्यमातून एकदिवसीय ‘आगरी शाला’ या उपक्रमाचे आयोजन नेरळ येथील आगरी समाज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी आगरी भाषेतून पहिले प्रवचन श्री मलंगगड येथील जयेश भाग्यवंत यांनी सादर केले. या उपक्रमाचे आणि ग्रंथालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, या एकदिवसीय कार्यशाळेत ‘आगरी शाला’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि आगरी समाजातील कला व साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन मान्यवरांना सन्मनीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माहीम-मुंबई येथील लेखक मोरेश्वर पाटील यांनी लिहिलेल्या ‘आगरी शाला’ या पुस्तकाचे प्रकाशन रेश्मा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आगरी भाषेत पी.एच.डी करणारे पनवेल येथील डॉ. अविनाश पाटील यांना ‘आगरी साहित्य गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर, चित्रपट सृष्टीत जुनियर जॉनी लीव्हर म्हणून ओळखलेले जाणारे मनोहर कोळंबे यांना ‘आगरी कला गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, श्री मलंगगड येथील जयेश भाग्यवंत यांनी आगरी भाषेतून पहिले प्रवचन सादर केले. प्रवचानादरम्यान, आगरी समाज ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या त्या ठिकाणी आगरी समाज बांधवांशी कोणत्याही कारणाने भांडायचे नाही. कोणत्याही कारणाने भांडण होण्याचा प्रसंग उद्भवला तर तात्काळ एक पाऊल मागे येण्याची माझी आचरण सर्व आगरी समाज बांधवांच्या कृतीतून व्हावे, असे आवाहन जयेश भाग्यवंत यांनी प्रवचनातून केले.
यावेळी जयेश भाग्यवंत, प्रा. एल.बी. पाटील, वसंत कोळंबे, मोरेश्वर पाटील, दया नाईक, सर्वेश तरे, प्रशांत मोरे आणि शिवनाथ बाबा आदी मान्यवर उपस्थित होते. या एकदिवसीय कार्यशाळेचे निमंत्रक कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी प्रास्ताविक केले. तर, संघटनेचे सचिव जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
आगरी भाषेतील पहिले प्रवचन सादर
यावेळी आगरी भाषेतील पहिले प्रवचन जयेश महाराज यांच्याकडून सादर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी,आता बहुतेकांची मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतात, त्यामुळे आगरी भाषेवर संकट आले असे अजिबात वाटत नाही; मात्र, त्या सर्व मुलांना घरातील संस्कार हे आगरी भाषा जिवंत ठेवण्यास पुरेसे आहेत. आता समाज शिक्षणाच्या प्रवाहात आहे. अशावेळी समाजातील व्यक्ती लगेच ओळखून येत नाही. त्यामुळे आपण कितीही पुढारलेले असलो तरी आपले आगरीपण बोली भाषेतून व्यक्त झाले पाहिजे, असे आवाहन जयेश भाग्यवंत यांनी केले.
