| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथील पाटील ब्रदर्स हॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, मार्केटींग, प्रक्रीया, ऊर्जा, शितगृह गोदाम परिषदेचे आणि सिध्देश्वर ॲग्रोटेक प्रदर्शन घेतले जाणार आहे. शनिवारी (दि.30) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.
पणन विभागाचे संचालक शरद जरे, थळ येथील आरसीएफ कंपनीचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, राष्ट्रीय शेअर बाजारचे मुख्य अर्थतज्ञ तिर्थंकार पटनाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, एसक्यूएम इंडिया प्रा.लि.चे संचालक व हेड मार्केटींग दत्तात्रेय पेरे, रॉयल कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स डोंबिवलीचे प्राचार्य डॉ. विवेककुमार पाटील, इंडियन ग्रीन हाऊसचे अध्यक्ष विश्वास जोगदंड, युनिर्व्हसल बायोकेमचे संचालक विश्वास सोंडकर, आदी मान्यवरांचे मार्गदर्शन राहणार आहे. यावेळी सेंद्रिय उत्पादने, कृषी औषधे, कृषी फलोत्पादनासाठी लागणारी साधने, अन्नधान्य साठवण प्रक्रीया यासाठी विविध कंपन्यांची उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी एक ते रात्री आठ यावेळेत हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शनात वनविकास महामंडळ मर्यादीत अंतर्गत वेगवेगळ्या झाडांची रोपे, बीपीसीएल व आरसीएफची कृषी फलोत्पादनासाठी असलेली उत्पादने, महिला बचत गटामार्फत पापड, लोणची, वेगवेगळ्या पध्दतीचा गुळाचा चहा, खाद्य पदार्थ, सुगंधीत मेणबत्ती, अगरबत्ती, साबण, कपडे, साड्या व खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना सेंद्रिय खत, व बियाण्यांचे नमुने वाटप केली जाणार आहेत. तसेच कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रीया आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन
