| कर्जत | प्रतिनिधी |
युनायटेड वे मुंबई जल संजीवनी कर्जत प्रकल्प आणि कोवेस्ट्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील डोंगरपाडा येथे शेतकर्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान बदलामुळे शेतीवर होणार्या दुष्परिणामांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामोरे जाऊन शेतकर्यांचे राहणीमान उंचावणे आहे. शेतकर्यांना आधुनिक सिंचन पद्धतीची माहिती मिळावी, उन्हाळ्यात पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा जेणेकरून अतिरिक्त पिके घेता येतील, जमिनीची होणारी धूप टाळावी, पिकांचे उत्पादन वाढून शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी इच्छुक शेतकर्यांना कोवेस्ट्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सामाजिक बांधिलकी अंतर्गत तुषार सिंचन संच वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन युनायटेड वे मुंबईचे मुकेश देव (प्रकल्प व्यवस्थापक-सामाजिक प्रभाव) यांनी केले.
याप्रसंगी कोवेस्ट्रो सी.एस.आर. टीमच्या प्रतिनिधी कविता, पुनीत आणि गार्गी यांनी शेतकर्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन संवाद साधला, तसेच त्यांच्या समस्या प्रकर्षाने समजून घेतल्या.
या सभेस खांडस, बलीवरे, आंभेरपाडा, बेलाचीवाडी, नांदगाव, पाथरज येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच युनायटेड वे मुंबई जल संजीवनी, कर्जत प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, प्रकल्प उपव्यवस्थापक मुक्ताजी कांबळे, प्रकल्प समन्वयक विवेक कोळी, कृषी तज्ज्ञ जोएब दाऊदी व समूह सहायक संतोष काटे हे उपस्थित होते.