। खोपोली । प्रतिनिधी ।
बिस्किटाचे उत्पादन करणार्या पार्ले या नामांकित कंपनीतील इलेक्ट्रिक इंजिनियर प्रमोद लाड या ३१ वर्षीय तरूणाने सकाळी ड्युटीवर असताना विषारी रसायन प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे.त्यामुळेच या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी दोषी असणार्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात अली आहे.
खालापूर तालुक्यातील खोपोली पेण रस्त्यावर तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत खिरखिंडी येथे असलेल्या पार्ले कंपनीत प्रमोद लाड इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ८ वर्षापासून पार्ले कंपनीत नोकरी करणार्या प्रमोद यांच्या वेतनात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यांच्यापेक्षा कमी शिकलेल्या आणि आठ वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्या कर्मचार्यांना मात्र वेतनवाढ करण्यात आली आहे. आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेल्यांना वेतनवाढ झाल्याने प्रमोद लाड यांनी आपले वेतन वाढवण्याची मागणी व्यवस्थापनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र वेतन वाढवण्याऐवजी व्यवस्थापनाकडून प्रमोद लाड यांचा मानसिक छळ केला जात असल्याचे नातेवाईकांचे म्हणने असून व्यवस्थापनाकडून होणार्या त्रासाला कंटाळलेल्या प्रमोद यांनी निराशेतून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
व्यवस्थापनाकडून होणारी पिळवणूक आणि मानसिक त्रासाबाबत चिठ्ठी लिहून ठेवत प्रमोद यांनी शुक्रवारी कंपनीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रमोद यांनी औषध प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचार करीत शरीरातील ९० टक्के विषारी रसायन काढल्यानंतर पुढील उपचारासाठी प्रमोदला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रमोद लाड हे माजी आमदार सुरेश लाड यांचे पुतणे आहेत. या घटनेची माहिती मिळताच कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, राष्ट्रवादीचे खालापूर तालुका अध्यक्ष नरेश पाटील, सुरेश जाधव यांच्यासह अनेकांनी पार्वती रुग्णालयात धाव घेतली.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रमोद यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुरेश लाड यांचे चिरंजीव अक्षय लाड यांनी दिली आहे. कंपनीचे एचआर चंद्रकांत कुलकर्णी यांनी वाद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रमोद यांची समजूत घातल्याची माहिती देताना पोलिसांच्या मदतीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचे कुलकर्णी यांनी संगितले. प्रमोद यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक छळ होत असावा असा आरोप करत प्रमोद यांच्या नातेवाइकांनी या प्रकरणात दोषी असणार्यांवर कारवाईची मागणी केली आहे.