| रायगड | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांसाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याचा व्यापक आवाका लक्षात घेता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा दोन गटांत होणार असून पहिल्या गटात शासकीय व खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी निबंधाची शब्दमर्यादा 500 ते 800 अशी आहे. दुसरा गट खुला असून राज्यातील सर्व महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. या गटासाठी 800 ते 1200 शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटांसाठी निबंध केवळ मराठी भाषेत सादर करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा कालावधी 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 असा आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 9152230193 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नोंदणीसाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना त्याची पोचही दिली जाणार आहे.
या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अ. मु. पवार यांनी केले आहे.







