| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. राब जाळण्यापासून बांधबंदिस्तीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. कडक उन्हामुळे शेतकरी पहाटे अथवा सायंकाळी तापमान कमी झाल्यावर शेती मशागतीची कामे करत आहेत.
सध्या पालापाचोळा गोळा करून राब जाळणे, बांधावर असलेले झाडांचे कुंपण काढणे, बांधावरील गवत जाळणे, काढणे, बांधबंदिस्ती करणे, पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधाला लागून चर खोदणे, अशा अनेक प्रकारची कामे शेतांमध्ये सुरू आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी बैलजोडी, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या आधारे कामे सुरू आहेत. त्यामध्ये नांगरणी, सपाटीकरण करण्याच्या कामांना वेग आला आहे. पहाटे व संध्याकाळी पाचनंतर राब जाळण्याचे काम शेतकरी करत आहेत. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासूनच शेतकरी बांधबंदिस्तीची कामे करत असतात. त्यानंतर दुपारी ऊन कमी झाल्यावर पुन्हा शेतावर येऊन शिल्लक कामे उरकण्याचे सुरू असते. बदलत्या वातावरणामुळे पाऊस कधीही पडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात मग्न झाले आहेत. गेल्या वर्षी बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता. त्यामुळे यंदा काय होणार याची सर्वांना आस लागली आहे. गेल्या हंगामात पावसाने काही ठिकाणी मोठी हजेरी लावली होती. यंदा येणाऱ्या पावसाचे रुप कसे असणार ? याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.







