निधी वितरणास शासनाची मान्यता; विशेष वाढीव दराने मिळणार मदत
| नागोठणे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका व नागोठणे परिसरातील अतिवृष्टीग्रस्त दुकानदार व टपरीधारकांना त्यांच्या व्यावसायिक नुकसानीपोटी विशेष वाढीव दराने आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना कपडे, घरगुती भांडी व वस्तूंच्या नुकसानीसाठी ही विशेष वाढीव दराने मदत मिळणार आहे.
रोहा व नागोठणे परिसरासह रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे दुकाने आणि टपऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक छोट्या व्यावसायिकांचे व्यवसायाचे साहित्य, मालमत्ता तसेच दुकानांच्या संरचनेचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या या दुकानदार व टपरीधारकांना केवळ नियमित मदतीपुरते मर्यादित न ठेवता विशेष वाढीव दराने मदत मिळावी, यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. याच अनुषंगाने दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रालयातील मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील घरे, दुकाने, शेती, पशुधन तसेच इतर मालमत्तेच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः नागोठणे व रोहा परिसरातील नुकसानग्रस्त दुकानदार व टपरीधारकांना नुकसानभरपाई तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे पूर्ण झाले असून, दुकानांच्या नुकसानीसाठीचा प्रस्ताव विभागीय स्तरावरून शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय स्तर व रायगड जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या कपडे तसेच घरगुती भांडी व वस्तूंच्या नुकसानीसाठी लेखाशीर्ष अंतर्गत निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना उणे प्राधिकरण पत्रावर कोषागारातून निधी वितरीत करता येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे झाले असल्याची खातरजमा करूनच निधीचे वितरण करावे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दुकानदार आणि टपरीधारकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित नुकसानीसाठी विशेषवाढीव दराने आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे व्यवसायावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती, पशुधन, घरे, दुकाने, टपऱ्या तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांच्या नुकसानीची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढून आपत्तीग्रस्तांना त्वरित दिलासा मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
