। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असणार्या गणपती बाप्पााच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चाकरमान्यांची लगबग सुरु आहे. कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. यासाठी दरवर्षी मुंबईसह अन्य शहरांमधील हजारो चाकरमानी गणपती उत्सवाच्या काळात कोकणातील आपापल्या गावी जात असतात. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचार्यांनी संपाची हाक दिल्याने चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचार्यांकडून मंगळवारी (दि.3) संपाची हाक देण्यात आल्याने एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, कर्मचार्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.