। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई, बॅन्डमन, चालक या पदासाठी मैदानी चाचणी झाली. मागील महिन्यात लेखी परिक्षादेखील घेण्यात आली. मात्र अनेक दिवस उलटूनही या परिक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. त्यामुळे भावी पोलिसांना पोलीस भरतीच्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
रायगड पोलीस दलातील 422 जागांसाठी 31 हजार 63 उमेदवारी अर्ज भरले होते. शुक्रवारी (दि.21) जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नेहूली येथील जिल्हा क्रीडा संकुलासह आरसीएफ क्रीडा संकुलामध्ये मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणींतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मागील महिन्यात 11 ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. सर्वसाधारण शिपाई पदासाठी होणार्या लेखी परीक्षेला चार हजार 747 उमेदवार उपस्थित होते. परीक्षा होऊन एक महिना होत आला आहे. तरीदेखील भरतीचा निकाल जाहीर झाला नाही. त्यामुळे भावी पोलिसांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.