| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय पायलट तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सृष्टी तुली असे या वैमानिक तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या 25 वर्षीय महिला पायलट मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिचा प्रियकर आदित्य पंडित याने हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या मते, आदित्यने सृष्टीवर मानसिक अत्याचार केले, तिला सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले आणि तिच्या आहाराच्या निवडींवर टीका केली. विशेषत: गुरुग्राममधील एका कार्यक्रमादरम्यान मांसाहारी भोजन केल्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. सोमवारी (दि.25) सकाळी सृष्टीने आदित्यला फोन करून आत्महत्येची धमकी दिली. आदित्य तातडीने सृष्टीच्या घरी जाण्यासाठी निघाला. मात्र सृष्टीला वाचवण्यास उशीर झाला होता. आदित्यने सृष्टीच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर दार ठोठावले, पण प्रतिसाद मिळाला नाही. चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दार उघडल्यावर सृष्टी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याबाबतची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात सृष्टीने आपल्या राहत्या घरीच गळफास घेत आयुष्य संपवल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य पंडित याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आदित्यला मंगळवारी (दि.26) न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. सृष्टीच्या कुटुंबीयांनी तिला न्याय मिळावा यासाठी मागणी केली आहे. ही तक्रार मुलीच्या काकांनी पोलिसात दिली असून, पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत.