हवा प्रदूषण मोजणी यंत्रणा बंद; प्रदूषणामुळे महाडकारांच्या नाकीनऊ

दुर्गंधीने नागरीक त्रस्त; कारवाईचा फक्त दिखावा
। महाड । प्रतिनिधी ।
एमआयडीसीमधील प्रदूषणाचा मुद्दा काही केल्या संपत नसून गेले काही दिवस महाड परिसरात हवेतील प्रदूषण नागरीकांच्या जीवावर उठले आहे. हवेतील दुर्गंधीयुक्त वास या परिसरात पहाटे पसरत आहे. हवा प्रदूषण मोजणी यंत्रणा गेली दोन वर्षापासून ठप्प आहे. यामुळे कंपन्यातून बाहेर येणार्‍या रायायनिक वासाने नागरीक त्रस्त झाले आहेत. नागरीकांच्या तक्रारीनुसार महाडमधील काही कपंन्यांवर प्रदूषण मंडळाने केलेली कारवाई पोकळ ठरली आहे. महाड औद्योगिक परिसरात बहुतांशी कंपन्या रासायनिक उत्पादन करणार्‍या आहेत. आद्यौगिक वसाहती मधील जल आणि जमीन प्रदुषण हा कायम वादाचा विषय बनला आहे. वादग्रस्त काही कंपन्यांना बंदच्या नोटीसा देखिल बजावण्यात आल्या असुन तरीही परिसरातील प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले असल्याचे दिसुन येते. येथील रासायनिक कपंन्यातील दुषित सांडपाणी आंबेतच्या खाडीमध्ये सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु दुषित पाणी प्रथम सव आणि त्या नंतर ओवळे गावा जवळ सोडण्याचा उद्योग एमआयडीसी कडून करण्यात आला आहे. दुषित पाण्यामुळे तालुक्यातील खाडीपट्टा आणि बिरवाडी परिसरांतील गावांना फटका बसला असुन बिरवाडी आणि खाडी परिसरातील पाणी आणि जमीन दुषित झाल्याने त्याचा परिणाम आरोग्या प्रमाणे शेती उत्पन्नावर झाला आहे. जल आणि जमीन प्रदुषणाकडे पाहताना प्रदुषण नियंत्रण मंडळाने हवेच्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत महाड मध्ये बसविण्यात आलेली यंत्रणा कालबाह्य झालेली असुन या माध्यमातुन केवळ हवेतील सल्फर आणि नायट्रोजन हेच घटक मोजले जात आहेत. ज्या एजन्सीला काम देण्यात आले आहे त्या एजन्सी कडून मात्र हवेत घातक घटक नसल्याचा अहवाल दिला जात आहे. यामध्ये आता बदल करीत एअर मॉनेटरींग सिस्टीम बसविण्यांत आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातुन हवा प्रदुषण आणि त्यांतील घटक मोजण्याचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले होते. परंतु सदरचे काम गेल्या दोन वर्षा पासुन ठप्प आहे.

प्रदुषण नसलेल्या ठिकाणी यंत्रणा
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये धूळ जमा करणारे डस्ट संप्लर बसविण्यात आले आहेत. या यंत्राने हवेतील धुळ जमा करुन यातील सल्फर आणि नायट्रोजनचे घटक मोजले जातात.पी.पी.एल.अग्निशामक केंद्र आणि पाणी शुद्धीकरण केंद्र या तीन ठिकाणी हे यंत्र बसविण्यात आले आहेत. या तिनही ठिकाणी धुळीचा किंवा वायु प्रदुषणाचा त्रास जाणवत नाही, अशा ठिकाणी ही यंत्रे बसविण्यात आली आहेत. स्थानिक प्रदुषण नियंत्रण कमेटीच्या शिफारशी प्रमाणे यंत्रे बसविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

Exit mobile version