। पॅलेस्टाईन । वृत्तसंस्था ।
इस्राईल आणि पॅलेस्टाईनी कट्टरतावादी संघटनांदरम्यान संघर्ष तीव्र झाला आहे. बुधवारी गाझापट्टीमधून इस्राईलमध्ये शेकडो रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. त्यानंतर इस्राईलने तुफानी हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 24 जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 5 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. त्याबरोबरच पॅलेस्टाईनी इस्लामिक जिहादी संघटनेच्या तीन नेत्यांचाही समावेश आहे.
अल जझिरा ने दिलेल्या वृत्तामध्ये सांगितले की, 400 हून अधिक रॉकेट गाझामधून इस्राईलच्या दिशेना डागण्यात आली आहेत. त्यामधील बहुतांश रॉकेट इस्राईलच्या मिसाईल डिफेन्सने नष्ट केली. एपीने आपल्या वृत्तात सांगितले की, इस्लामिक जिहादने आपले रॉकेट हल्ले सुरूच राहतील, असे सांगितले. समूहच्या एका अधिकार्याने सांगितले की, पॅलेस्टाईनमधील टार्गेटेड किलिंगच्या अभियानाला रोखण्यासाठी इस्राईलने शब्द द्यावा अशी आमची मागणी होती. मात्र त्यांनी मंगळवारी सकाळी आमच्या 3 कमांडर्सची हत्या केली.
तर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याही यांनी दावा केला की, इस्राईलने कट्टरतावाद्यांना मोठा धक्का दिला आहे. मात्र त्यांनी हा काळ संपलेला नाही. आम्ही दहशतवादी आणि त्यांना पाठवणार्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहतोय. तुम्ही लपू शकत नाही. आम्ही तुमच्यावर हल्ला करण्यासाठी वेळ आणि ठिकाण निवडतो, असा इशाराच त्यांनी दिला आहे.