फुलांच्या बागा फुलविण्याचा रोटरीचा उपक्रम
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहे येथे रोटरी क्लबच्यावतीने अजान वृक्षासह अन्य विविध फुलांच्या बागा फुलविल्या जाणार आहे.याचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आम.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
अजान वृक्षाचे रोप रोह्याच्या श्री धावीर देवस्थान परिसरात लावून या स्थानाची अध्यात्मिक उंची इतकी वाढली आहे की इंद्रायणी नदी अथवा चंद्रभागेच्या प्रवाहात स्नान करून श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री पंढरीरायाचे दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य लाभते तेच पुण्य श्री धावीर मंदिरात ध्यान धारणेसाठी येऊन इथल्या अजान वृक्षाचे सान्निध्यात बसून मिळेल. अध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व असलेल्या या वृक्षाची जोपासना रोहेकर नक्कीच करतील व दर स्वातंत्र्यदिनाला आज लावलेल्या झाडांचे वाढदिवस साजरा करू असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब रोहा च्या वतीने 750 रंगीबेरंगी फुलांची झाडे लावून रोहा शहराला फुलांचे शहर करण्याच्या उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ सचिन पुणेकर, श्री धावीर मंदिर देवस्थान विश्वस्त अॅड प्रशांत देशमुख, नगरसेवक महेंद्र गुजर, मकरंद बारटक्के, नवरात्रोत्सव कमिटी अध्यक्ष शैलेश कोळी, रोटरी क्लब रोहा चे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष अब्बास रोहावाला, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रकाश पवार आदि उपस्थित होते. या उपक्रमात लायन्स क्लब रोहा सहभागी संस्था आहे.
यावेळी बोलताना आमदार अनिकेत तटकरे यांनी रोटरी क्लब रोहा यांनी लायन्स क्लब रोहा च्या सहभागातून हातात घेतलेल्या या उपक्रमात संवर्धन होणा-या झाडांचा रंग व सुगंध रोह्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षित करेल असा विश्वास व्यक्त करून या निमित्ताने विविध वृक्षांचे अध्यात्मिक, ऐतिहासिक व शास्त्रीय महत्त्व सर्वांना कळेल असा आशावाद व्यक्त केला.
अजान वृक्षाचे रोप श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी स्थानावरील अजान वृक्षापासून तयार झाले आहे. अध्यात्मिक ज्ञान प्राप्ती व वृद्धीसाठी या वृक्षाची सावली उपयुक्त आहे. यामागे शास्त्राचा आधार आहे. या वृक्षाची पानातून मिळणा-या रसाने मेंदूची उपयुक्त संप्रेरके मिळतात व मूळातून ओझोन वायू बाहेर पडत असल्याने त्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होतो.
डॉ. सचिन पुणेकर,वनस्पती शास्त्रज्ञ
यावेळी अजान वृक्ष व सुवर्ण पिंपळ वृक्षावर भारतीय टपाल खात्याने प्रकाशित केलेले तिकिट यावेळी रोहेकरांसाठी प्रकाशित करण्यात आले. रोटरी अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर यांनी बहावा, गुलमोहर, सुवर्णपुष्प, पळस, कांचन अशा रंगीबेरंगी फुलांच्या झाडांच्या माध्यमातून रोहा फुलांचे शहर हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न आहे. या बरोबर सुवर्ण पिंपळ व चंदन या वृक्षाची रोपे लावणार असल्याचे सांगितले. सर्व रोहेकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन रोह्याला फुलांचे शहर करण्याच्या चळवळीचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले. सुखद राणे यांनी सूत्रसंचालन केले तर विदुला परांजपे व सहकारी सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. वृक्षारोपण कार्यक्रमात अंधार आळी ग्रामस्थ मंडळ, धनगर आळी ग्रामस्थ, दमखाडी ग्रामस्थ, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, सकल मराठा समाज, ब्राम्हण मंडळ रोहा सहभागी झाले होते.