| नागपूर | प्रतिनिधी |
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी अंतर्गत कलह वाढताना दिसत आहेत. असे असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर मौन बाळगत कुणालाही भेटणे टाळले आहे. ते सोमवारपासून गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत.
सोमवारी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नॉट रिचेबल असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळत आहे. ते दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाकडून अजित पवार नॉट रिचेबल नसल्याचे सांगण्यात आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, अजित पवार कुठेही नॉट रिचेबल झालेले नाहीत. ते त्यांचे नियमित कामकाज करत आहेत. ते नागपुरातील त्यांच्या निवासस्थानीच आहेत. त्यांनी काल पदाधिकार्यांच्या बैठकाही घेतल्या. मंत्रिमंडळातील खातेवाटप संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते काल आणि आज कोणालाही भेटले नाही अथवा विधिमंडळातही आले नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या जुन्याजाणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाचा चेहरा बदलण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रात विशेषत: नाशिक जिल्ह्यातून पवार यांनी माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ या दोघांना संधी देऊन या भागात पक्षांचे बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालवला आहे. शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जाणार्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत अजित पवार यांनी या भागातून हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, मकरंद जाधव-पाटील यांना संधी दिली आहे.
दोन खात्यांचा पेच कायम
महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खात्याचा पेच असल्याने अजित पवार दिल्लीत असल्याचे समजते. आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला आणि बाल विकास विभागासाठी पंकजा मुंडे आग्रही आहेत. तर अर्थ खात्यासाठी भाजप आग्रही आहे. अजित पवारांना सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. पण, महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळावे यासाठी अजित पवार आग्रही आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी ते कालपासून दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनदेखील अजूनही खाते वाटप जाहीर झाले नसल्याची चर्चा सुरु आहे.