बाळा नांदगावकर यांनी लगावला टोला
| नेरळ | प्रतिनिधी |
मनसेने आता लोकसभा लढायचे आणि जिंकायचे हा मंत्र स्वीकारला आहे. सगळीकडे चाललेल्या पळवापळवीला जनता कंटाळली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. अजित पवार यांनी आम्हाला सहकारी संस्थांबाबत सांगू नये. कारण, त्यांना याच सहकारमधील घोटाळ्याने प्रायश्चित्त करावे लागले आहे, हे तुम्ही कदाचित विसरला आहात, असा टोलादेखील त्यांना लगावला. कर्जत येथे आयोजित सहकार परिषद आणि दोन दिवसीय सहकार शिबिराच्या समारोपप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी काल राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी एकतरी सहकारी संस्था काढली काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही संस्था काढली आणि घोटाळे केले आणि शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे डोक्याला हात लावून बसावे लागले, ही तुमची स्थिती आहे, अशी टीका नांदगावकर यांनी केली.
मुंबईमध्ये आम्ही सर्वजण लोकसभा निवडणूक लढणार आहोत, असे जाहीर करीत मनसेचे आता ठरले आहे; लढायचे आणि जिंकायचे, असे ठामपणे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच सहकार म्हणजे ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ याप्रमाणे लोकसभा लढण्याचा कानमंत्रसुद्धा त्यांनी दिला. या दोन दिवसीय शिबिराचा समारोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर तसेच पक्षाच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसेचे नेते अनिल शिदोरे यांच्यासह मनसे सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, मनसे रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे किसान सेल अध्यक्ष संतोष नागरगोजे, मनसे सहकार सेलचे पदाधिकारी, सरचिटणीस विजय जाधव, अनिता माझगावकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे, महिला उपाध्यक्ष प्रियांका शृंगारे, मुंनर पवार, बाळासाहेब शिंदे, संजय अराडकर, महेश फरकले, अनिल व्यास, मुंबई उपाध्यक्ष वैभव भोर, प्रकाश मिस्त्री, संजय घावरे, रावसाहेब शिंदे, सागर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जे.पी. पाटील, कर्जत अध्यक्ष महेंद्र निगुडकर तसेच मिलिंद मिसाळ, अक्षय महाले, यशवंत भवारे, सचिन करणुक, अभिजित घरत, समीर चव्हाण, हेमंत चव्हाण, धनंजय दर्गे, सतीश कालेकर, भारती कांबळे, तेजश्री भोईर आदी कार्यकर्त्यांनी सहकार शिबीर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.