खा. संजय राऊत यांना लगावला टोला
। मुंबई । प्रतिनिधी ।
गेले कित्येक दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असून लवकरच भाजपच्या दिशेने जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज अजित पवार यांनी मौन सोडले असून या सर्व अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार; भाजपसोबत जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
माझ्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या सहकार्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांच्या सह्या घेण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादीत आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार, असे सांगत अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरु असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. आपण सातत्याने माझ्याबद्दल बातम्या देत आहात, त्यामध्ये यत्किंचित तथ्य नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी आज नेहमीप्रमाणे ऑफिसला बसलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेहमीप्रमाणे कमिटीच्या मिटिंगला आले होते. त्यांची मंत्रालयात कामं होती. मी इकडे होतो म्हणून ते मला भेटायला आले. या आमदारांची माझ्याकडे काही कामं असतात. मात्र, गैरसमज पसरवणार्या बातम्यांमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण त्यांनी काळजी करु नये. राजकारणात अनेक चढउतार येतात. महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, आता कोणतेही गैरसमज पसरवू नका. आता या विषयाचा तुकडा पाडा. हा विषय इथेच संपवा, असे अजित पवार यांनी म्हटले.
मी नागपूरची वज्रमूठ सभा आटोपून येत असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत विमानातून आलो होतो. यावळी आमच्यात चर्चा झाली होती. तेव्हा मी त्यांना या सगळ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते, असेही अजित पवार यांनी सांगितले. परंतु, मध्यंतरी मी भाजपमध्ये जाणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे मी एकटाही लढेन, असे म्हटले. चुकीच्या बातम्यांमुळे हे गैरसमज निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडीत राहण्याची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढवणे, हीच आमची भूमिका असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसविषयी सुरु असलेल्या चर्चांविषयी बोलायला आमच्या पक्षाचे प्रवक्ते समर्थ आहेत. उगाच दुसर्या पक्षाच्या नेत्यांनी आमचे प्रवक्ते म्हणून बोलू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, आमचे वकीलपत्र त्यांनी घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी राऊतांना लगावला.