आक्षी चोरी प्रकरण! चोरट्याला मिळाली अनोखी शिक्षा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
आक्षी चोरी प्रकरणी अलिबाग येथील न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला वन विभागाच्या क्षेत्रात 30 झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. आक्षी येथे एलईडी बल्बची चोरी 2020 मध्ये झाली होती.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश निगडे यांच्याकडे सोपावण्यात आला. त्यांच्या सोबत पोलीस नाईक राजेश ठाकूर चोरट्यांचा शोध घेत होते. दरम्यान एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. तपासानंतर त्याने चोरी केल्याचे कबूल केले. त्याने नागाव हटाळे येथील हॉलीडे होम कॉटेजमधून 6 जून 2015 मध्ये दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित वन विभागाच्या अधिकारात येणार्‍या जागेत 30 झाडांची लागवड करण्याची अशी शिक्षा सुनावली असल्याची माहिती तपासिक अधिकारी हवालदार रुपेश निगडे यांनी दिली.

Exit mobile version