|अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
घर मालकाच्या कपाटातून 25 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या मोलकरणीला अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी एक वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
लक्ष्मी चंद्रकांत जाधव, रा. श्रीबाग नं. २. झोपडपटटी, अलिबाग असे या महिलेचे नाव आहे. ती जतिन कांतीलाल कराणी, रा. आनंदनगर चेंढरे, ता.अलिबाग यांचे घरी मागील दहा वर्षांपासून घरकाम करीत होती. दि.०२ ऑक्टोबर २०२१ रोजी जतिन कराणी यांच्या घरातील उघडया कपाटातून रक्कम रुपये २५ हजार चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लक्ष्मी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तिच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच्या सुनावणी दरम्यान आरोपी लक्ष्मी हिला दोषी ठरवत अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी एक वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. कविता परीट यांनी काम पाहिले.