पोलादपूरतील ब्रिटीशकालीन पुलांसाठी धोक्याची घंटा

। पोलादपूर । वार्ताहर ।
23 जुलै 2022 रोजी पोलादपूर शहराला नळपाणीपुरवठा करणार्‍या जुन्या जॅकवेलला चोळई व सावित्रीच्या संगमावर जलसमाधी मिळाल्याने आता आंबेनळी घाटातील सर्वच काँक्रीटचे जॅकेट घालण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन जीर्ण पुलांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या पोलादपूर वाई सुरूर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी पोलादपूर ते प्रतापगड आणि पुढे प्रतापगड ते महाबळेश्‍वर असा रस्ता अतिवृष्टी आणि भूस्खलनाने बाधित झाल्यामुळे पोलादपूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ठेकेदारांचे उखळ पांढरे करून दिल्यानंतर आता कायमस्वरूपी उपाय करण्याऐवजी आगामी काही पावसाळे उखळ पांढरे करण्याचा धंदा कायम ठेवण्याचा विचार राजकीय इच्छाशक्तीच्या पाठिंब्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने कायम ठेवला आहे.

आंबेनळी घाटातील चार जीर्ण ब्रिटीशकालीन पुलांना गेल्या 2016 मध्ये काँक्रीटीचे जॅकीट घालण्याचे काम करून रूंदीकरण करणार्‍या सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूरने केले. यानंतर पहिल्याच पावसातच मोरगिरी फौजदारवाडी फाटयाजवळच्या पुलावरील रस्ता खचल्याने कामाचा दर्जा उघड झाला. मात्र, गेल्या वर्षभरात बांधलेल्या मोरीजवळील धबधब्याच्या पाण्यामुळे मोरीजवळचा रस्ता खचून वाहू लागला असून घाटातील एकेरी वाहतूक आता केवळ छोटया वाहनासाठी सुरू आहे. परिणामी, आंबेनळी घाटातील जॅकीटधारी पुलांवरून तुरळक वाहतूक सुरू असल्यानेच हे पुल अद्याप शाबूत आहेत. या सर्व कामांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची गरज असून सरकारचा सुमारे 9 कोटीचा निधी या कामावर खर्च झाल्यामुळे लाभार्थीचे काय करायचे, याबाबतही स्वतंत्र चौकशी करून निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलादपूर ते प्रतापगडदरम्यान सिमेंट काँक्रीटचे जॅकेट घालून आजमितीस उभे असलेल्या जीर्ण ब्रिटीशकालीन पुलांना महाड एमआयडीसीजवळच्या सावित्री नदीवरील पुलाप्रमाणे अचानक जलसमाधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर वाई सुरूर राज्यमार्गावरील गेल्या 12 वर्षांत झालेल्या सर्व कामांची दर्जा व गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अभियंत्यांकडून निष्पक्षपणे चौकशी करण्याची गरज असून या आंबेनळी घाटातील वाई सुरूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यास नव्याने मजबुतीसह बांधकाम होऊन हा घाट सक्षमपणे वाहतुकीस कायम निर्धोक होऊ शकणार आहे.

Exit mobile version