| पोलादपूर | प्रतिनिधी |
गेल्या काही वर्षांमध्ये महाबळेश्वरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटातील दरडी काढण्यासाठी पोलादपूर तालुक्यासह अन्य जिल्ह्यातील अर्थमुव्हींग यंत्रणा मागविण्यात येऊन कोटयवधींची बिले काढण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारामध्ये समजून येत आहे. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेमध्ये पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर राज्यमार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले असल्याचे दिसून आले आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये जेसीबी आणि डम्पर यांची संख्या वाढीस लागल्यापासून पावसाळी ठेकेदारांना स्लॅक सीझन ऐवजी एक्स्ट्रा इनकम करण्याची संधी दरडी कोसळण्यामुळे होत असते. 2021 मध्ये दरडी कोसळल्याच्या ठिकाणांपेक्षाही अधिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या मदतीने दरडी हटविण्याचे काम केल्याची बिले काढल्याने ज्या ठेकेदाराच्या नावाने ही बिले काढली त्याला आणि त्याच्या मुलगा, पत्नी व भगिनी यांच्या नावानेही कोटयवधी रूपयांची बिले अदा केल्याची माहिती माहितीच्या अधिकाराद्वारे प्राप्त झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतीतील गेल्यावर्षी झालेली ठेकेदाराची दुबईवारी आणि शाखाअभियंत्याच्या ऑडी या अलिशान कारची चर्चा रंगतदार ठरली होती. 2021 मधील दरड कोसळण्याची जीवघेणी घटनाही चक्क जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांनी रस्ता करताना डोंगर उभा कापल्याने घडल्याची चर्चा उघड उघड होऊ लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत झालेल्या रस्त्याच्या कामामध्येदेखील उन्हाळी कामे आटोपताच पावसाळी कामे उदभवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यशस्वी होऊन जागोजागी दरडी कोसळून नैसर्गिक आपत्ती निवारण यंत्रणेमार्फत जेसीबी आणि डम्पर्सना कामे मिळाल्याचे दिसून येत आहे. 2021 च्या अनुभवातून यंदादेखील पावसाचे आगमन होऊन केवळ एक दोन आठवडेच झाल्यानंतर काही प्रगतशील ठेकेदारांनी आपत्कालीन सोशल मिडीयाच्या समुहातून जेसीबी लावून दरडी हटविण्याचे काम कसे तत्परतेने केले याबाबत चर्चा घडवून आणल्या आहेत. आता पोलादपूरच्या अर्थमुव्हींग ठेकेदारांना पावसाळी कमाईचे साधन पाऊस सुरू होताच दरडी कोसळण्याच्या माध्यमातून उपलब्ध झाले असून या दरडी कोसळण्याच्या घटनांचे जिऑलॉजिकल सर्वेक्षण करण्याऐवजी उन्हाळयात लक्ष ठेवण्याचीच अधिक गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.