पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य

नेरळ पोलिसांच्या धडक कारवाईतून उघड

। नेरळ । प्रतिनिधी ।

गुजरात राज्यातून विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारे गावच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. दरम्यान तब्बल एक कोटींची विदेशी दारू पोलिसांनी हस्तगत केली असून, टँकर चालकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

नेरळ पोलिसांना गुप्त बातमीदार यांच्या माध्यमातून बनावट विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, आणि उप अधीक्षक राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन घेऊन नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी मुरबाड- कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर सापळा रचला. गुप्तचर यांच्या माहिती नुसार शनिवारी (दि.21) नेरळ पोलीस ठाणे कडील अधिकारी आणि अंमलदार यांचे संयुक्त तपास पथक यांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत वारे येथील कोकण किनारा हॉटेल येथे संशयास्पद टँकर ताब्यात घेतला. टँकर चालक लादुराम खियाराम बिष्णोई हा गोवा बनावटीची दारूची विनापरवाना वाहतुक करत होता. वारे गावचे हद्दित कोकण किनारा हॉटेलच्या समोर कर्जत-मुरबाड रोडवर आढळून आला. हा सापळा रचला त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक वरोटे, पोलीस उप निरीक्षक सुनील शेंबडे, किसवे, पोलीस हवालदार पिंगळे, गुजराती, लावरे, खंडागळे, वाघमारे, गर्जे, राजाभाऊ केकान, आशू बेंद्रे, पिसाट,वांगणेकर, कनके, डाखोरे, काळे,यांच्या पथकाने भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरला अडवले आणि हा संशयास्पद टँकर ताब्यात घेण्यात आला.

नेरळ पोलिसांच्या या धडक कारवाईची माहिती जिल्हा उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कारवाईत पोलिसांनी 29 लाख किमतीचा टँकर ताब्यात घेण्यात आला असून, त्या टँकर मध्ये 41 लाख 28 हजाराची एव्हरग्रीन व्हिस्की, 15 लाखाचा मोबी ऑरेंज व्हिस्की आणि 16 लाखाचा वोडका असा साधारण 1 कोटी 1 लाख 27 हजाराचा माल जप्त केला. नेरळ पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले आहे.

Exit mobile version