अल्फिया पठाण आशियाई बॉक्सिंग चॅम्पियन

| नागपूर | प्रतिनिधी |

गेल्यावर्षी जागतिक युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या नागपूरच्या अल्फिया पठाणने अम्मान (जॉर्डन) येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत 81 पेक्षा अधिक किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू होय. अल्फियाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होय.

उपांत्य फेरीत अल्फियाने कझाकस्तानच्या 2016 च्या विश्‍वविजेत्या लझ्झत कुंगेबायेवा हिच्यावर 5-0 अशी मात केली होती. अल्फियाने लझ्झतवर दुसर्‍यांदा मात केली. गेल्यावर्षी इलरोडो करंडक स्पर्धेतही तिने लझ्झतवर मात केली होती. अंतिम सामन्यात अल्फियाने यजमान जॉर्डनच्या इस्लाम हुसेली हिच्यावर मात केली. पहिल्या राऊंडच्या शेवटी हुसेलीला पंचांनी अपात्र ठरविल्यानंतर अल्फियाला विजयी घोषित करण्यात आले. भारताचे हे स्पर्धेतील चौथे सुवर्ण व एकूण दहावे पदक ठरले. दरम्यान, टोकियो ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या लोवलिना बोरगोहेन, परवीन हुड्डा, स्वीटी बोरा यांनीही भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. सुवर्णपदकाच्या दृष्टीने भारतीय महिलांची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी होय.

Exit mobile version