| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शहा आयसीसीचे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी हे पद स्वीकारले, तर बीसीसीआयचे सचिव कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे.
आयसीसीच्या कार्याध्यक्षपदासाठी जय शहा यांना 16 पैकी 15 बोर्ड सदस्यांचे समर्थन आहे. या पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यासाठी आता काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. बीसीसीआयमधील त्यांच्या सचिवपदाचा एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. 27 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आणि आयसीसी कार्याध्यक्षपदाची सूत्रे 1 डिसेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जय शहा यांना तीन वर्षांचा कुलींग कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर ते पुन्हा बीसीसीआयच्या प्रशासनात येऊ शकतात. जय शहा आयसीसीमध्ये गेल्यास बीसीसीआयच्या सचिवपदासाठी राजीव शुक्ला, आशीष शेलार, अरुण धुमल, देवजित सैकिया आणि रोहन जेटली यांची नावे चर्चेत येऊ शकतात.