पाण्यात आल्या अळ्या

पालीकरांचा आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

| सुधागड -पाली | वार्ताहर |

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या जटिल आहे. 27 कोटी रुपयांची शुद्ध पाण्याची योजना देखील अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया न होता पाली अंबा नदीतून थेट पाली शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी अनेक वेळा नळाच्या पाण्यातून अळ्या, शंख, शिंपले, शेवाळ, गाळ व कचरा तर कधी चक्क साप आल्याचे प्रकार घडतात. तसाच प्रकार पुन्हा पाली नगरपंचायत हद्दीत घडला असून झाप गावातील काही रहिवाशांच्या घरात पिण्याच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. हा प्रकार संपूर्ण पाली नगरपंचायत हद्दीत होत असल्याचे पालीतील नागरिकांनी सांगितले. परिणामी भाविक व नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

ही गंभीर बाब निदर्शनास येताच मनसेचे पाली शहर अध्यक्ष दिपेश लहाने यांनी पाली नगरपंचायत, पाली सुधागड तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले. दूषित पाण्याची तपासणी करून या अळ्या नक्की कसल्या आहेत याची खात्री करावी, पाण्याच्या टाक्या, पाण्याचे पाईप याची तपासणी करून साफसफाई करावी जेणेकरून रोगराई पसरणार नाही तसेच याबाबत सात दिवसांच्या आत अहवाल मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. यावेळी भावेश बेलोसे, तेजस परबळकर, प्रतीक आंग्रे आदींसह मनसे सैनिक उपस्थित होते.

त्या अळ्या कसल्या आहेत त्याची तपासणी करण्यासाठी पाठवले आहे. तसेच पाण्याच्या टाक्या, पाण्याचे पाईप यांची तपासणी करून साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे

विद्या येरूनकर,
मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत

पाली शहरातील पाण्याच्या पाईप लाईन ह्या 1970 साली टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या आताच्या स्थितीला जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पाण्यातून कीटक येत असल्याचे ही बाब आम्ही देखील नाकारत नाही. यावर उपाय योजना करण्यासाठी पाली नगरपंचायत माध्यमातून नवीन पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सुधीर भालेराव,
सभापती, पाणी पुरवठा,पाली नगरपंचायत.

Exit mobile version