अलिबागच्या हापूसचा अमेरिकेत डंका

जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या रसाळ हापुसचे नाव
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रायगडच्या हापुसचा प्रभाव
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोकणातील हापूस चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती व असंख्य आव्हाने पेलत अलिबाग रायगड (कोकण)चा गावठी हापूस सातासमुद्रापार पोहोचला आहे. त्यामुळे येथील आंबा बागायतदार सुखावला आहे. जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंबा बागायतमधील गावठी हापूसचा अमेरिकेत डंका वाजत आहे. अमेरिकेत अलिबाग व इतर कोकणच्या या गावठी हापूसने भाव खाल्ला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणच्या हापूसचा प्रभाव दिसून येत आहे.
आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा तसेच महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र 3,57,290 हेक्टर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होत असून, त्यापासून शेतकर्‍यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळत आहे. हापूस आंब्यापाठोपाठ इतर विभागातील केशर आंबाही मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आंब्यापासून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले की, यावर्षी हवामान बदल होत प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपूर्ण कोकणात 2 डिसेंबर रोजीच्या पावसाने आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले. एक दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनानंतर परदेशातील मार्केट आता व्यापार विनिमयासाठी मोकळे झाले आहे. अमेरिकासारख्या राष्ट्रात कोकणातील अलिबागच्या गावठी हापूसला मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आलेत, असे म्हणायला हरकत नाही. वादळ व पाऊस यामुळे खूप मोठे नुकसान झाले. पुढची दहा वर्षे हे नुकसान भरून येणार नाही. कोकणातील शेतकरी कधी निराश होत नाही, कोव्हिडमध्ये आंबा कमी असूनही उत्पादन चांगले मिळाले. कारण, कोव्हिडने आंबा शेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत थेट विक्रीचा मार्ग मिळाला. यातून आंबा शेतकर्‍यांना अधिकचा नफा मिळू लागलाय, असे संदेश पाटील म्हणाले.
कोरोनाने दोन वर्षांपासून देशात विविध ठिकाणी पिकला जाणारा आंबा परदेशात विकला गेला नव्हता. त्यामुळे आंबा उत्पादक व शेतकरी यांना मोठा फटका बसला होता. मात्र, आता संधीची दारे खुली झाली आहेत. यंदा आंब्यांची निर्यात परदेशात होणार असल्याने आंब्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तम दर्जाचा आंबा निर्यात होणार असल्याने आंबा उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा होत आहे. दोन वर्षांपासून असलेली निर्यांत बंदी उठवल्याचा फायदा होणार आहे.

रायगड जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये आंबा बागांचे क्षेत्र 14 हजार हेक्टर इतके आहे. उत्पादनक्षम आंबा बागा या 12,540 हेक्टर क्षेत्रावर आहेत. मागील दोन वर्षात निसर्ग व तौक्ते चक्री वादळाने फळ बागा व आंबा बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्री वादळाने जवळपास 8000 हेक्टर क्षेत्राचे, तर तौक्ते चक्री वादळाने जवळपास 1100 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शासनाकडून एनडीआरएफ व एसडीआरएफचे नॉर्मनुसार शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे.कृषी विभागामार्फत ज्या फळ बागा क्षेत्रांचे नुकसान झाले त्या क्षेत्रात फळबाग पुनर्लागवड व पुनर्जीवित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आजतागायत 4123 शेतकर्‍यांना 13 कोटी रक्कम वितरित केलेली आहे. अजूनही 22,364 शेतकर्‍यांना जवळपास 27 कोटींचा निधी वितरित करणार आहोत. सदर निधी मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच हा निधीदेखील वितरीत केला जाईल.

फळबागांचे मागील दोन वर्षांपासून होणार्‍या नुकसानीतून सावरण्यासाठी कृषी विभाग शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. शेतकर्‍यांनी या परिस्थितीत डगमगू नये, शासन व कृषी विभाग आपल्या पाठीशी उभा आहे. दरम्यान, रायगड अलिबाग येथील आंबा परदेशात निर्यात होत असल्याने आंबा उत्पादकांना चांगली संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होतेय ही बाब समाधानकारक आहे.

दत्तात्रेय काळभोर, उपसंचालक कृषी विभाग अलिबाग रायगड, प्रभारी कृषी अधीक्षक, अलिबाग रायगड
Exit mobile version