केंद्रीय पथकाकडून पाहणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्य सरकारने अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे. त्यानुसार आज अलिबाग येथे सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आयसीएमआरचे तीन जणांचे केंद्रीय पथक दाखल झाले आहे. तीन जणांच्या दोन पथकाने विभागून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत पाहणी केली.
जिल्हा सामान्य रुगणालायत ओपीडी, अपघात विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयू, मेडिकल वार्ड, सर्जिकल वार्ड, प्रयोगशाळा, औषध भांडार, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय इमारत याची एका पथकाने पाहणी केली. तर दुसरे पथक आरसीएफ येथे तात्पुरते तयार करण्यात आलेले लेक्चर रूम, हॉस्टेल, वैद्यकीय अधिकारी निवासस्थान आणि इतर मेडिकल फ़ॅकल्टी इमरतीची पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या पाहणी दोर्यानंतर अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राकडून यावर्षात मंजुरी मिळणार का याकडे आता रायगड करांचे लक्ष लागले आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर याठिकाणी 52 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाने मंजूर केली आहे. राज्य शासनाने महाविद्यालयासाठी 406 कोटी निधीही मंजूर केलेला आहे. राज्य सरकारने अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला आहे. उसर येथे शासकीय महाविद्यालयाचे काम सुरू झाले नसले तरी तात्पुरते जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत महाविद्यालयाच्या अनुषंगाने लागणारे स्ट्रक्चर उभारले जात आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजची पहिली बॅच यावर्षात सुरू करण्याचा पालकमंत्री अदिती तटकरे याचा मानस आहे. अद्याप केंद्राची परवानगी मिळालेली नाही. मात्र केंद्रीय पथक अलिबागेत पाहणी साठी दाखल झाल्याने लवकरच ही परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिल्ली येथून तीन जणांचे केंद्रीय पथक आज अलिबागेत दाखल झाले. या पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत महाविद्यालयाच्या अनुषंगाने लागणार्या स्ट्रक्चरची पाहणी केली. यावेळी जेजे रुग्णालयाचे डॉक्टर, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ गिरीश ठाकूर यांनी पथकाला माहिती दिली. रायगडात वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी इच्छा अनेक वर्षे रायगडकरांची होती. त्यादृष्टीने आता पावले उचलली जात असल्याने केंद्राची मंजुरी मिळाल्यास लवकरच रायगडकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास रायगडकरांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार आहेत. यासाठी मुंबई, पुणेकडे जाण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.