अलिबाग अकॅडमीचा झणझणीत विजय

। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।

आरडीसीए सदस्य समीर मसुरकर पुरस्कृत रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्यावतीने कॅम्पोलियन क्लब टी-20 जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाने पेण स्पोर्ट्स असो. संघावर 6 गडी राखून झणझणीत विजय मिळवला आहे.

पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळलेल्या अंतिम सामन्यात अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेतररक्षण स्विकारले होते. प्रथम फलंदाजी करताना पेण स्पोर्ट्स असो. संघाने 20 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी गमावत 153 धावसंख्या उभारली होती. सुरवातीचे फलंदाज झटपट बाद झाल्याच्या नंतर मधल्या फळीत रवी सोलंकी यांनी धुवांधार फलंदाजी करत 57 तर दुसर्‍या बाजूने समीर आवस्कर यांनी 53 धावा काढून संघाची धावसंख्या 153 पर्यंत पोचवली. अलिबाग संघाकडून अभिषेक नाईक 2 रितेश तिवारी, मिहिर भाटकर यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.

154 धावसंख्येचा पाठलाग करताना अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाने संयमी फलंदाजी करत सलामीवीर अभिजीत रोहांदिया 39 व मिहिर भाटकर यांनी 32 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत अलिबागचा युवा तंत्रशुद्ध फलंदाज हृषिकेश राऊत यांनी चौफेर टोलेबाजी करत नाबाद 45 धावा ठोकल्या त्याला चैतन्य पाटील यांनी दुसर्‍या बाजूने नाबाद 12 धावांची खेळी करत साथ दिली. अलिबाग संघाने सामना शेवटच्या षटकात 6 गडी राखून जिंकला. पेण स्पोर्ट्सकडून सिध्दार्थ म्हात्रे यांनी 2 तर तुषार म्हात्रे यांनी एक गडी बाद केला.

अंतिम सामन्यासाठी प्रमूख अतिथी म्हणून रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष राजेश पाटील, सदस्य अ‍ॅड. पंकज पंडित, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, रायगडचे माजी कर्णधार रविंद्र तांडेल, उदय गद्रे, डॉ.राजाराम हलवांन, पंच चंद्रकांत म्हात्रे, सुयोग चौधरी, आदेश नाईक, सुनील सरगर यांच्यासह दोन्ही संघाचे खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version