दिग्गजांच्या गीतांनी अलिबागकर श्रोते मंत्रमुग्ध

पीएनपी नाट्यगृहात सुरेल संगीत रजनीचे आयोजन; विशेष मुलांच्या शाळेच्या विकासासाठी देणार निधी

| अलिबाग | प्रतिनिधी |

किशोर कुमार, येसुदास, हरिहरन आणि एस. पी. बालसुब्रमण्यम या दिग्गज गायकांच्या अजरामर गीतांनी अलिबागकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. निमित्त होते संतोष ल्हासे यांच्या ‘गोल्डन हिट्स’ आणि ‘सिंग अलाँग म्युझिक हब’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 22) पी.एन.पी. नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या सुरेल संगीत रजनीचे. आत्मनिर्भर पालक असो. ट्रस्ट संचालित विशेष मुलांच्या शाळेच्या विकासासाठी निधी उभारण्याच्या सामाजिक हेतूने आयोजित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पी.एन.पी. एज्युकेशन ट्रस्टच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक उपक्रमासाठी चारिटी शो आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले. ”एखाद्या संस्थेच्या मदतीसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित होणे ही कौतुकास्पद बाब आहे. पी.एन.पी. नाट्यगृह आणि शेकाप नेहमीच कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. सामाजिक कामासाठी कधीही गरज भासल्यास शेकापकडे हक्काने आवाज द्या; तुमच्या हाकेला नक्कीच प्रतिसाद मिळेल,” असे प्रतिपादन चित्रलेखा पाटील यांनी केले.

सुरांनी सजलेल्या या संगीत रजनीत पुण्याचे गायक अनिलकुमार घाडगे यांनी ‘व्हॉइस ऑफ किशोर कुमार’ म्हणून किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांचे बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या आवाजातील किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गीतांनी उपस्थित रसिकांना जुन्या आठवणींच्या विश्वात नेले. तर हरिहरन, येसुदास आणि एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाची विशेष ओळख असणारे संतोष ल्हासे यांनी मंजुषा कुलकर्णी आणि सेजल दूधसागर यांच्या साथीने या दिग्गज गायकांच्या गाजलेल्या गीतांची सुरेल मेजवानी रसिकांसमोर सादर केली. एकापाठोपाठ एक सादर झालेल्या गीतांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विनायक देशपांडे, उपाध्यक्ष विश्वास तांबोळी, सचिव नागेश कुलकर्णी, संचालक महेंद्र गावंड, पराग पाटील तसेच शिक्षिका प्रियांका पाटील यांनी संस्थेला मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी भरघोस मदत करणाऱ्या देणगीदारांचे तसेच अलिबागकर रसिकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन पटेल, मुकुंद तारदाळकर, रूपा ल्हासे, ग्रंथ मित्र नागेश कुलकर्णी तसेच सिंग अलाँग म्युझिक हबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी उपक्रम
अलिबाग शहरात एखाद्या सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी अशा स्वरूपाचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला. विशेष मुलांच्या शिक्षण व विकासासाठी कार्यरत असलेल्या आत्मनिर्भर पालक असो. ट्रस्टच्या शाळेला आर्थिक हातभार लागावा, या उदात्त हेतूने या चारिटी शोचे आयोजन करण्यात आले होते.
Exit mobile version