श्वेता दांडेकरला मिळाली भरभरून दाद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
लायन्स अलिबाग फेस्टीवल 2025चे आयोजन अलिबागच्या समुद्रकिनारी करण्यात आलेे. त्यानिमित्ताने रविवारी (दि.26) इंडियन आयडॉल श्वेता दांडेकर प्रस्तुत ‘लाटा सुरांच्या’ हा मराठी व हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सायंकाळी घेण्यात आला होता. यावेळी श्वेता दांडेकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने अलिबागकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी गायलेल्या कोळीगीत, लोकगीतांसह वेगवेगळ्या हिंदी, मराठी गाण्यांच्या तालावर अनेक जण थिरकले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अलिबागकरांनी मनमुरादपणे आनंद लुटला.
लायन्स अलिबाग फेस्टीवलमध्ये ‘लाटा सुरांच्या’ या संगीत रजनी कार्यक्रमात महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी कथन करणारी नवी-जुनी कोळीगीते व लोकगीतांचे सादरीकरण करण्यात आले होते. श्वेता दांडेकर यांच्या सुमधूर आशा आवाजाने मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. गाण्यांच्या तालावर अलिबागकर मंत्रमुग्ध होऊन थिरकले. इंडियन आयडॉल या कार्यक्रमात झळकलेली गायिका या कार्यक्रमात आल्याने प्रेक्षकांना गाण्याचा एक वेगळा आनंद प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. यावेळी तरुणांसह महिला श्वेता दांडेकर यांच्या भरदार आवाजाला दाद देत पुन्हा पुन्हा आवडीची गाणी ऐकण्याची मागणी करत होत्या.
लायन नितीन शेडगे यांनी मुख्य आयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या या संगीत रजनी कार्यक्रमात फेस्टिवल अध्यक्ष नयन कवळे, सेकंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, फेस्टिवलचे जनक अनिल म्हात्रे, फर्स्ट व्हीपी प्रदीप नाईक, संजय पाटील, लायन अध्यक्ष अॅड. गौरी म्हात्रे, सचिव महेश कवळे, खजिनदार अंकिता म्हात्रे, भगवान मालपाणी, गिरीश म्हात्रे, संतोष पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह लायन्स अलिबाग सदस्य, डायमंड सदस्य आणि दहा हजारांहून अधिक संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रतिम सुतार यांनी आपल्या शैलीत केले.
'पेट शो 'ला उत्स्फुर्त प्रतिसाद
लायन्स अलिबाग फेस्टीवलमध्ये गेल्या पाच दिवसांपासून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. फेस्टीवलमध्ये अबालवृध्दांच्या पसंतीचे कार्यक्रम होत असल्याने नागरिकांची अलोट गर्दी होत आहे. रविवारी सायंकाळी लाटा सुरांच्या या संगीत रजनी कार्यक्रमापूर्वी डॉ. नितीन भोसले आयोजित पेट शो घेण्यात आला. यामध्ये कुत्रा, मांजर यांच्या असंख्य जाती, प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आणि प्रात्यक्षिकांमधून डोळ्यांचे पारणे फेडणार्या कवायती पाहावयास मिळाल्याने पाळीव प्राणी प्रेमींसाठी ती एक वेगळी पर्वणी ठरली.