16 लाखांचा ऐवज जप्त
। पुणे । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्याच्याकडून 16 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घरफोडी करणाऱ्या या चोरट्याविरुद्ध 50 गुन्हे दाखल असून, न्यायालयाकडून जामीन मिळवून तो नुकताच कारागृहातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने भोरमधील श्रीपतीनगर भागात चार घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (वय 31 रा. मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. भोर शहरातील श्रीपतीनगर भागात एकाच वेळी चार बंद घरांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याची घटना 13 जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्यचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता. पोलिसांनी श्रीपतीनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असता घरफोडी करण्यापूर्वी पाच ते सहा आधी माने तेथे येऊन गेल्याचे डिसऑन आले. त्याने बंद घरांची पाहणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. माने मोटारीतून शिरवळकडून पुण्याकडे निघाल्याची माहिती तपास पथकाला मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करत ससेवाडी परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याकडून चोरलेला ऐवज, मोटार असा 16 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.