एक दिवस तरी वारी अनुभवावी उपक्रमातून दिंडी; विद्यार्थी, महिला, वारकरी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलिबागमध्ये विठ्ठलनामाच्या अखंड गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या अनोख्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विठ्ठलभक्ती, समाजसेवा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या दिंडीत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत शेकडो भाविक सहभागी होत अलिबागकरांनी प्रत्यक्ष वारीचा आनंद अनुभवला.
अलिबाग येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून गुरुवारी (दि. 23) पहाटे भक्तिमय दिंडीला प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. वरसोली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिंडीची सांगता झाली.
या दिंडीत रामनाथ मराठी शाळेतील सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांसह लायन्स क्लबचे पदाधिकारी, विविध महिला बचत गटांच्या सदस्य, नागरिक, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे कर्मचारी आणि असंख्य वारकरी भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाला धर्मादाय आयुक्त राजेश इंगोले, डॉ. कोकणे, जागृती फाऊंडेशनच्या जागृती बेलेकर, लायन्स क्लबचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
वारीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी जागृती फाउंडेशनच्या जागृती बेलेकर यांच्या वतीने पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता तसेच आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आली. अनेक वारकऱ्यांना कुर्ते आणि सदरे वाटप करून सेवाभावाचे दर्शन घडविण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव-चव्हाण, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, उपाध्यक्ष महेंद्र पाटील आणि खजिनदार डॉ. नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव-चव्हाण यांनी अलिबाग ते वरसोली हा संपूर्ण पालखी सोहळा पालखी खांद्यावर घेत पायी पूर्ण केला. त्यांच्या भक्तिभाव, समर्पण आणि सेवाभावाने उपस्थित वारकरी व भाविकांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माथाडी कामगार संघटना, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, महिला बचत गट, लायन्स क्लब, जागृती फाऊंडेशन, विद्यार्थी आणि सर्व वारकरी भक्तांचे आयोजकांनी आभार मानले. ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमातून भक्ती, सेवा, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश अलिबागकरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
