होऊ द्या खर्च? सुस्थित रस्त्याची पुन्हा दुरुस्ती

अलिबाग-रेवस एक कोटीची निविदा कोणाच्या फायद्यासाठी, शेकापचा सवाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-रेवस मार्गावरील रस्ता सुस्थितीत असताना त्या रस्त्यावर पुन्हा काम काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांकडून निविदा काढण्यात आली आहे.  त्याच रस्त्याच्या साईटपट्टी, मोर्‍यांच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. चांगल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा निधीची मागणी करून या अधिकार्‍यांकडून शासनाच्या निधीचा अपव्यय करण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप शेकापचे माजी जि.प.सदस्य संजय पाटील यांनी केला आहे. आवश्यकता नसताना, तालुक्यांची रस्त्यांवर काढण्यात आलेली निविदा रद्द करा व अंदाजपत्रकांची पडताळणी करून संबंधितांविरोधात कारवाई करा, अशी मागणी त्यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.

अलिबाग-रेवस रस्त्याचे काम दोन ते तीन वर्षापूर्वी करण्यात आले. या रस्त्यावर पडलेले दोन ते तीन खड्डे वगळता या रस्त्याचा डांबरी भाग उत्तम स्थितीत आहे. असे असूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून कोणतीही पाहणी न  करता,  मार्च 2022 मध्ये या अर्थ संकल्पात या रस्त्याचे काम आर्थिक फायद्यासाठी पुन्हा सुचविण्यात आले आहे का, असा सवाल संजय पाटील यांनी केला आहे. याला अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांचा पाठिंबा आहे का, असाही त्यांचा सवाल आहे.

 या कामांच्या प्रशासकीय मान्यतेच्या अंदाजपत्रकांमध्ये डांबरीकरणाव्यतिरिक्त पक्की गटारे, बांधणे, मोर्‍यांची दुरुस्ती व पुनर्बांधणी  करणे आदी कामांचा समावेश आहे. तरीदेखील प्रत्यक्ष तांत्रिक मान्यतेच्या अंदाजपत्रकात या रस्त्यावरती भागाभागात मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकामध्ये 75 मी.मी. जाडीचे एम.पी.एम करणे, त्यावर 50 मी.मी. जाडीचे बीएम करणे, त्यावर 25 मी.मी. जाडीचे बी.सी करणे आदींचा समावेश आहे. अंदाजपत्रकामध्ये या रस्त्याच्या प्रत्येक किलोमीटरच्या लांबीमधील केवळ शंभर ते तीनशे मीटर लांबीचे बी.एम. व बी.सी करणे अशा स्वरुपाचे पॅच वर्क दाखविण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून अर्थसंकल्पीय मंजूर असलेल्या कामांमध्ये प्रशासकीय मान्यतेच्या अंदाजपत्रकात समावेश नसतानाही अशा स्वरुपाचे पॅच वर्कचे काम प्रस्तावित  करण्यात आले आहे. त्याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी संजय पाटील यांनी केली आहे.

या कामाची निविदा रद्द करून घाईघाईने निविदा काढणार्‍यांवर कारवाई करावी अशीही लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे आपण केली आहे. गटार मोर्‍यांची गरज असताना, डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरणाचे काम दाखवून बिले काढण्यासाठी पैसे कमविण्याचा फंडा आहे.

संजय पाटील, माजी जि.प.सदस्य

हे आहेत आक्षेप  
अलिबाग रेवस हा रस्ता पूर्णपणे सुस्थितीत असून देखील अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेवे यांच्या सहीने या रस्त्यावरती डांबरीकरण करणे (बी.एम., बी.सी. व मुरमाची साईड पट्टी करणे) या कामाकरिता प्रत्येकी एक कोटीच्या रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. या कामांची किंमत एक कोटीच्या आत असल्यास या कामाला मुख्य कारण म्हणजे, या कामाला तांत्रिक मान्यता कार्यकारी अभियंता स्तरावरूनच देता येते. त्यामुळे ती एक कोटींपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.

रस्त्यावर अनेक ठिकाणी भराव झाला असल्यामुळे काही भागात रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे डांबरी पृष्ठभाग खराब होण्याची शक्यता असल्यामुळे पक्की गटारे बांधणे, तसेच तात्पुरत्या स्वरूपातील पावसाळी गटारे काढणे या कामांची जास्त गरज आहे. तसेच या रस्त्यावरती अस्तित्वातील मोर्‍या बुजविल्या गेल्या असल्याने या मोर्‍यांची पुनर्बांधणी करण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. कामांच्या प्रशासकीय मान्यतेच्या अंदाजपत्रकांमध्ये डांबरीकरणासोबतच गटारे बांधणे व मोर्‍यांची पुनर्बांधणी करणे या कामांचा समावेश करण्यात आला होता. परंतु तांत्रिक मान्यतेच्या अंदाजपत्रकातून ही अत्यावश्यक असलेली कामे वगळून फक्त डांबरीकरणाच्या व साईड पट्टीच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

तांत्रिक मान्यतेच्या अंदाजपत्रकामध्ये डांबरीकरण प्रस्तावित करताना सलग लांबीचे काम प्रस्तावित करण्यात आलेले नाही. त्याऐवजी प्रत्येक किलोमीटरमध्ये 200 ते 250 मीटर लांबीचे डांबरीकरणाचे पॅच दर्शविण्यात आले आहेत. अशाप्रकारे कामांच्या एकूण 18 किलोमीटर लांबी मध्ये 18 डांबरीकरणाचे पॅचवर्क प्रस्तावित करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकामध्ये या पॅचचे नेमके साखळी क्रमांक देखील नमूद करण्यात आलेले नाहीत. अंदाजे प्रत्येक किलोमीटरला 200 ते 250 मीटर लांबी गृहीत धरण्यात आली आहे.

कामांच्या अंदाजपत्रकांना कार्यकारी अभियंता  यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी न करता तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चुकीच्या अशा अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता दिली आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या निविदांच्या अटी शर्तींमध्ये हे काम मर्जीतल्या डांबराचा प्लांट असलेल्या ठेकेदाराला कसे मिळेल या दृष्टीने अटी घालण्यात आल्या आहेत.

 दरम्यान, या आरोपांसंदर्भात कार्यकारी अभियंता जे.ई.सुखदेवे  यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही.

Exit mobile version