कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने दुमदुमले अलिबाग

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग शहर लाल बावट्याच्या घोषणांनी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने दुमदुमून गेले. सकाळी सात वाजल्यापासूनच त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. त्यानंतर वेश्वी येथील पीएनपी नाट्यगृहात झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सकाळी नऊपासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. काही वेळातच संपूर्ण सभागृह खचाखच भरले. जयंत पाटील सभागृहात दाखल होताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात आणि “जयंत पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है, लाल बावट्याचा विजय असो” अशा घोषणांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रम संपेपर्यंत एकही कार्यकर्ता जागेवरून उठला नाही. आपल्या लाडक्या नेत्याला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी शेवटपर्यंत कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि नव्या जोमाने पक्षासाठी काम करण्याचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.

Exit mobile version