प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील स्थानकाच्या दुरुस्तीचे काम एसटी महामंडळ रायगड विभागामार्फत ठिकठिकाणी सुरु झाले आहे. अलिबाग स्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, बसस्थानकाच्या फलाट क्रमांक एकची अवस्था जीर्ण झाली आहे. या फलाटाची भिंत कोसळली आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अलिबाग एसटी बस स्थानकातील फलाट क्रमांक एकची भिंत काही दिवसांपूर्वी कोसळली होती. मात्र, या कोसळलेल्या भिंतीकडे एसटी बस आगाराकडून दुर्लक्ष केल्याने तेथील भगदाड वाढत गेले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या फलाटासमोर दोरी बांधून प्रवाशांना प्रवेश बंद केला आहे. कमकुवत झालेल्या भिंतीमुळे अपघात होण्याची भीती असताना, त्याकडे मात्र आगारप्रमुखांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याला जबाबदार नक्की कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.