अलिबागच्या विद्यार्थ्यांची भरारी; कलाम सॅटेलाईट लाँच व्हेईकल मिशनमध्ये सहभाग

| अलिबाग | प्रतिनिधी |

डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेहीकल मिशन अंतर्गत भारतातील पहिले हायब्रीड रॉकेट महाबलीपुरम तामिळनाडू येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. त्यासोबत विद्यार्थ्यांनी बनविलेले 150 उपग्रह अवकाशात यशस्वीपणे नेण्यातआले. मोहिमेत अलिबाग तालुक्यातील विविध विद्यालयांचेे विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे उपग्रह बनविण्यासाठी केळकर विद्यालयामधील स्वरा अविनाश पाटील (नववी), जय विश्‍वनाथ म्हात्रे (सातवी), आरसीएफ स्कूल कुरुळचे अवधूत संदीप वारगे (अकरावी), परी संदेश काटकर (नववी), वायशेत जि.प.शाळा मोनिका संदीप बाबर (सहावी), बबिता चव्हाण (सहावी), करण रिअल अकॅडमी अलिबाग शाखेच्या सिद्धी पवार (दहावी), श्रुती भंडारकर (दहावी) यांनी सक्रिय सहभाग घेतला. या मुलांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अस्सीस्ट वर्ल्ड रेकॉर्ड, एकेआयएफ अशी पाच प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

हे रॉकेट महाबलीपुरम येथून अवकाशात सोडले. हे रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या आणि राज्य सरकारकडून मिळविण्यात आल्या होत्या. सदरचे रॉकेट उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर पॅराशुटच्या साह्याने परत जमिनीवर लँड केले आणि पुढील मिशनसाठी परत वापरण्यात येणार आहे. असा प्रयोग अमेरिकेत एलोन मास्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी 150 पिको उपग्रह सोबत असे रॉकेट हा पहिलाच प्रयोग असल्याने अशा प्रयोगाने भारतीय विद्यार्थी क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील. आणि भविष्यात अशा मिशन मधून डॉ. कलाम यांच्या सारखे शास्त्रज्ञ तयार होण्यास आणि नवीन विकसित भारत तयार होण्यास हातभार लागेल.

महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकल्पाचे मार्गदर्शन मनिषा ताई चौधरी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.मिलिंद चौधरी सर करीत आहेत. महाराष्ट्रात 20 जानेवारी पुणे येथे उपग्रह बनविणेची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत कोकण विभागीय समन्वयक श्री. संदीप दत्तात्रय वारगे सर यांनी मार्गदर्शन करून कठोर परिश्रम घेतले. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ. किरण पाटील, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. नाखले मॅडम, केंद्रप्रमुख श्री. संतोष गावंड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version