| अलिबाग | प्रतिनिधी |
उत्कृष्ट कामगिरी करून संपुर्ण रायगड जिल्ह्याचे नावलौकिक करणारे रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संदीप वारगे यांचा मंगळवारी अलिबागमध्ये सन्मान करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी करण्यात आला.
संदीप वारगे हे अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील रहिवासी आहेत. ते सध्या सध्या हटाळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवा करीत आहेत. डॉ. एपीजे अब्दूल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम यांची 19 फेब्रुवारी रोजी 125 उपग्रहनिर्मिती व प्रक्षेपण ही राष्ट्रीय मोहीम पार पडली. या मोहिमेत संदीप वारगे यांनी शाळेतील तीन विद्यार्थी व कोकण विभागातील 12 विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. हे विद्यार्थी उपग्रह प्रक्षेपणासाठी तामिळनाडू येथील पट्टीपुलम येथे सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना पाच आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक रेकॉर्ड, एपीजे अब्दूल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या या कामगिरीने जिल्ह्याचे नावलौकिक झाल्याने त्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.