। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेच्या डंपींग ग्राउंडवर लागलेल्या आगीमुळे शहरामधील नागरिकांमध्ये घबराट पसरून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यास नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याने शेकापक्षाचे माजी उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी नगरपरिषदेत जाऊन प्रशासकीय अधिकार्यांना जाब विचारत धारेवर धरले. तात्काळ उपाययोजना करीत यावर नियंत्रण मिळवण्याच्या सुचना माजी उपनगराध्यक्षा अॅड मानसी म्हात्रे तसेच माजी गटनेते प्रदीप नाईक यांनी केल्या. यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर आदी उपस्थित होते.
अलिबाग शहरातील गोविंद बंदर येथील डंपिंग ग्राउंडमधील कच-याला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असल्याने या परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरून प्रचंड प्रदूषण निर्माण होत आहे. यामुळे रात्रीनंतर वयोवृद्ध आणि बालकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यावर लोकप्रतिनिधींनी वारंवार नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधत या समस्येवर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. मात्र मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांचे दुर्लक्ष होत असल्याने यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग नगरपरिषदेसह आजूबाजूच्या चेंढरे, वरसोली व कुरुळ ग्रामपंचायतीना घनकचरा प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या तीन ग्रामपंचायतींसह शहरातील कचरा टाकण्यात येत असल्याने दिवसेंदिवस या डंपिंग ग्राउंडमधील कच-याचे साम्राज्य वाढतच चालले आहे. या तीन ग्रामपंचायतींसह शहरात दरदिवशी कित्येक टन कचरा निघतो. तो या डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र यापूर्वी येथे टाकण्यात येणार्या कचर्याची लेव्हलींग कटिंग होत नसल्याने काही महिन्यांपासून डंपिंग ग्राउंडमधील कच-याला वारंवार आग लागते. ती आग अनेक दिवस धुमसत राहते. यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. या प्रदूषणकारी धुरामुळे अलिबाग शहरात या कच-याचा धुर पसरू लागला आहे. वयोवृद्ध आणि बालकांना खोकला, दम्यासारखे आजार होण्याची भीती नाकरता येत नाही. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज माजी उपनगराध्यक्षा अॅड मानसी म्हात्रे यांच्यासह माजी गटनेते प्रदीप नाईक यांनी केल्या.
यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर, संजय कांबळे यांनी नगरपरिषदेत भेट देत मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने जबाबदार अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. जर प्रशासनाला नियंत्रण मिळवता येत नसेल तर आरसीएफच्या अग्निशमन दलाच्या अधिकार्यांची मदत घेण्याचे यावेळी सुचित करण्यात आले.
प्रशासन अपयशी
अलिबाग नगरपरिषदेत प्रशासक बसण्यापूर्वी असलेल्या तत्कालिन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील टिम काम करत असताना डम्पींग ग्राऊंडकडे गांभिर्यपूर्ण लक्ष दिले जात होते. डम्पींग ग्राऊंडमधील कचरा वेळोवेळी पसरविला जात होता. त्याची लेव्हलींग केली जायची. तो कट देखील केला जात असे. मात्र गेल्या वर्षभरात प्रशासन असल्यापासून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वारंवार कचरा पेट घेण्याचे प्रकार घडत आहे. यापूर्वी लागलेली आग तात्काळ विझविली जात होती. त्यामुळे कधी शहरात एवढया मोठया प्रमाणात धुर पहायला मिळाला नव्हता. मात्र या समस्येकडे लक्ष देण्यात नगरपरिषदे प्रशासन अपयशी ठरल्याने हा प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.