अलिबागच्या डॉ. विनायक पाटीलांकडे राज्याची धुरा

महाराष्ट्र स्टेट इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या कामगिरीत बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील यांनी राज्यस्तरावर मानाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील आठ हजारांहून अधिक बालरोगतज्ज्ञांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स या प्रतिष्ठित संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली.

बालआरोग्य, लसीकरण, कुपोषण, संसर्गजन्य आजार आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. या क्षेत्रातील डॉक्टरांना एकत्र आणणे, वैद्यकीय ज्ञान आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे, तसेच बालआरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. अशा प्रतिष्ठित राज्यस्तरीय संघटनेच्या नेतृत्वाची संधी अलिबागमधील डॉक्टरांना मिळणे, ही रायगड जिल्ह्यासाठी विशेष अभिमानाची बाब आहे. या नव्या जबाबदारीबाबत डॉ. विनायक पाटील यांनी महाराष्ट्रातील बालआरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्यातील प्रत्येक बालकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, बालआरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि आधुनिक वैद्यकीय ज्ञानाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीचे वैद्यकीय क्षेत्रासह सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Exit mobile version