आयपीएलचे सर्वच संघ बदलणार; नवीन नियमांचा विचार

संघ फक्त चार खेळाडूच टीममध्ये ठेवू शकतात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएलचा आता मोठा लिलाव लवकरच होणार आहे. या लिलावाचे काही नियम आहे. त्यामुळे या नवीन नियमांनुसार सर्वच संघ फक्त चार खेळाडूच आपल्या टीममध्ये कायम ठेवू शकतात. मुंबई इंडियन्सचा संघ या गोष्टीचा विचार करत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी रोहित शर्माला आपल्या संघात कायम ठेवेलच, पण त्याचबरोबर अजून कोणत्या तीन खेळाडूंना ते कायम ठेवू शकतील, याबाबतची माहिती आता समोर येत आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आता आपल्या संघाच्या रचनेचा विचार करत आहे. कर्णधार रोहित तर संघात कायम असेलच, पण त्याचबरोबर उपकर्णधार कायरन पोलार्डला ते आपल्या संघात कायम ठेवू शकतात. कारण रोहित जर काही कारणास्तव खेळाडू शकणार नसेल तर पोलार्ड हा संघाचे नेतृत्व करू शकतो. ही गोष्ट आपण यापूर्वीही पाहिली आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात जेव्हा रोहितला दुखापत झाली होती. तेव्हा पोलार्डने संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्याचबरोबर यावर्षीच्या आयपीएलमध्ये पोलार्डने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ पोलार्डला संघात कायम ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

मुंबई इंडियन्ससाठी वेगवान गोलंदाजीचा मारा सर्वात महत्वाचा आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला आपल्या संघात कायम ठेवण्याचा विचार करत असेल. कारण बुमरा हा एका षटकात सामना फिरवू शकतो, त्यामुळे तो जर संघात नसेल तर कामगिरीवर मोठा परीणाम होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच संघात कायम राहणार्‍या खेळाडूंच्या यादीत बुमराचे नाव असू शकते. आता चौथा कोणता खेळाडू संघात कायम ठेवायचा, हा मोठा प्रश्‍न मुंबई इंडियन्सच्या संघाला पडलेला असेल.


चौथ्या खेळाडूसाठी हार्दिक पंड्याचे नाव चर्चेत येत आहे. कारण बरीच वर्षे तो संघाचा एक अविभाज्य भाग आहे. पण पंड्या आता गोलंदाजी करताना दिसत नाही, त्यामुळे त्याच्याकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा संघ ठेवू शकत नाही. पंड्याला जर संघात कायम ठेवायचे नसेल तर सूर्यकुमार यादव हा एक चांगला पर्याय मुंबई इंडियन्सच्या संघापुढे आहे. कारण सूर्यकुमारने आतापर्यंत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ चौथा खेळाडू म्हणून सूर्यकुमारला आपल्या ताफ्यात कायम ठेवू शकतो. मुंबई इंडियन्ससाठी चार खेळाडू निवडणे हे नक्कीच आव्हान असेल. कारण सर्वच संघ या लिलावानंतर बदलणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या चार खेळाडूंना आपल्या ताफ्यात कायम ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Exit mobile version