जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी सर्वपक्षीय एकवटले

| उरण | वार्ताहर |
लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे. एन. पी.टी. प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडासाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्यानंतर, केंद्रीय मंत्री जि.के. वासन, खा. शरद पवार, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भूखंड वाटपाच्या निर्णयानुसार वाटप करण्यात येत असलेल्या भूखंडाच्या वाटप प्रक्रियेमध्ये येत असलेले अडथळे दूर करून जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटे आहेत. यासाठी स्व. दि.बा. पाटील अनुयायांची बैठक बुधवार, दि. 5 एप्रिल रोजी सायं. सहा वाजता दि.बांच्या संग्राम या निवासस्थानी पार पडली.

यावेळी जेएनपीटी चेअरमन, सिडको एम.डी. यांच्यासोबत पत्रव्यवहार करून यासंदर्भात लॉटरी, भूखंड वाटपासंदर्भात प्रगतीचा आढावा घेऊन येणार्‍या त्रुटीसंदर्भात राज्य व केंद्र सरकारच्या मंत्र्यासोबत बैठका घेऊन त्रुटी निवारण करण्यासाठी मार्ग काढण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणावरून संघर्ष समितीत चर्चा झाल्यानंतर कामगार नेते महेंद्र घरत यांच्या सूचनेनुसार, दि.बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल दि.बा. पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना हाक दिली व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सुटत नाहीत, तोपर्यंत दिबांचे कार्य संपलेले नाही म्हणून आपण दिबांच्या अनुयायांनी एकत्र येऊन प्रकल्पग्रस्तांसाठी कार्य करावे लागेल, अशी आर्त साद दिली. या बैठकीला माजी आ. बाळाराम पाटील, काँग्रेस नेते महेंद्र घरत, अतुल दि.बा. पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, विकास नाईक, मेघनाथ तांडेल, नरेश घरत, सीमा घरत, श्रुती म्हात्रे, गणेश कडू, जेएनपीटीचे विश्‍वस्त दिनेश पाटील, रवि पाटील आदी नेते उपस्थित होते.

Exit mobile version