शेकापचा आंदोलनाचा इशारा
मुख्याधिकार्यांंच्या दालनात ठेकेदाराला धरले धारेवर
। खोपोली । प्रतिनिधी ।
ताकई रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमीपूजन होऊन वर्ष झाले तरी 20 टक्केच काम झाले आहे. तसेच अनेक महिने काम बंद असल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहे. गंभीर समस्येविरोधात ताकई ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेत्यांनी पालिकेत मुख्याधिकार्यांची भेट घेत संपूर्ण कैफियत मांडत ठेकेदाराला धारेवर धरले असता, ठेकेदाराने उद्यापासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.तर काम सुरू केल्यानंतर पूर्ण काय होईपर्यंत काम बंद करू नये अन्यथा आमरण उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील यांनी दिला आहे.
ताकई रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने 4 कोटी 80 लाख रूपयांचा निधी दिला आहे. वर्षापूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी भूमीपूजन सोहळा केल्यानंतरही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. ठेकेदाराने हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने पूर्वीपेक्षा आता रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अखेर ग्रामस्थ आक्रमक होत मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेत समस्या मांडत ठेकादार आणि अभियंत्याविरोधात संताप व्यक्त केला.
यावेळी जि.प. सदस्य नरेश पाटील, मा. नगरसेवक सुनील पाटील, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शेकापक्षाचे जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, तालुका चिटणीस संदीप पाटील, मनसेचे नेते मनीष खवळे, साजगाव ग्रा.पं. सदस्य अजित देशमुख, साजगाव इंडस्ट्रीजमधील स्थानिक कंपनीचे मालक विक्रम पाटील, अनिल खालापूरकर, अशपाक लोगडे यांच्यासह ग्रामस्थ सर्वपक्षीय नेते ठेकेदार मंदार पाटील उपस्थित होते. मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून ठेकेदाराला धारेवर धरत उद्यापासून काम सुरू करण्याचे सांगत एमएमआरडीएकडे बिल मिळवून देण्यासाठी नगरपरिषद सहकार्य करणार असल्याचे सांगितले.







