सलग दुसर्या वर्षी स्वप्नातील गावाचा दर्जा
। सुधागड/पाली । प्रतिनिधी ।
स्वदेस फाऊंडेशनने गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वप्नातील गाव या स्पर्धेचे आयोजन केलेले होते. सुधागड तालुक्यातील पुई गावाने सर्वांगीण विकासाच्या कामांमध्ये सातत्य ठेवले असून गुणवत्तासुद्धा अबाधित ठेवली आहे. तसेच काही नवीन कामांची त्यामध्ये भर टाकली आहे. त्यामुळे सलग दुसर्या वर्षी स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून पुई या गावाला स्वप्नातील गावाचा किताब देण्यात आला.
स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व संचालक प्रदीप साठे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अनेक विकासात्मक अशी वेगवेगळी कामे होत आहेत. गावाचा विकास करण्यासाठी आणि गाव स्वप्नपूर्ण बनवण्यासाठी गाव विकास समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांची विशेष मेहनत आहे. त्याचबरोबर गावातील युवक आणि महिला यांचे योगदान सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. पुई या गावाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून सुधागड तालुक्यामध्ये एक नवीन आदर्श उभा केलेला आहे. या कार्यक्रमासाठी स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ वरिष्ठ समन्वयक श्रीधर कोकरे, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष निलेश शिर्के आणि कमिटीचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच गावातील युवक, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंभर टक्के पक्की घरे पुई गावाने एकत्रितपणे पुढे येऊन गाव विकासासाठी खूप कामे केली आहेत. या गावांमध्ये शंभर टक्के घरे पक्की आहेत. गावामध्ये अंतर्गत पक्का रस्ता आहे. सर्व घरे रंगीत एकाच कलरची आहेत. सर्वांकडे शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, सर्व कुटुंबांचा आरोग्य विमा, सर्व कुटुंबाच्या हाताला काम आहे. पात्र लाभार्थ्यांना पेन्शन योजना मिळत आहेत. गावामध्ये प्लास्टिकचे व्यवस्थापन केले जात आहे. ओल्या व सुक्या कचर्याचे व्यवस्थापन केले जात आहे. अशी अनेक विकासाची काम या गावांमध्ये झाली आहेत. त्यामुळेच या गावाला स्वप्नातील गावाचा दर्जा मिळाला आहे.