नागाव येथील स्मशानभूमीचे लोकार्पण
| उरण | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात सातत्याने विकास कामे होत आहेत. रस्त्यांची कामे असो वा पूलबांधणी, स्मशानभूमी, पाण्याबाबतच्या समस्या सोडविण्याचे काम शेकापकडून करण्यात येत आहे. ही कामे करीत असताना कोणताही गाजावाजा न करता आम्ही दिलेला शब्द पाळून कामे तडीस नेण्याचे काम करतो. आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी केले. उरण पीरवाडी नागाव येथील स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पार पाडला. यावेळी अॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते आदिवासी वाडीवरील साकव पुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आस्वाद पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सातत्याने विकासकामे होत आहेत. रायगड जिल्ह्यात रस्ते, पूल, स्मशानभूमी यांची कामे होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष कधीही बोलत नाही, तो करून दाखवतो, हीच आम्हाला शेकापक्षाची शिकवण आहे. जुन्या झालेल्या स्मशानभूमीचे नूतनीकरण झाले पाहिजे. आज नागाव ग्रामपंचायतीने जी सुविधा केली आहे, तिचे मी स्वागत करतो.
यावेळी ज्येष्ठ नेते काका पाटील, म्हणाले पावसाळ्यात जुलै महिन्यात समुद्राच्या भरतीमुळे या ठिकाणची स्मशानभूमी राहात नाही, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. यासाठी नागाव परिसरामधील नागरिकांच्या मागणीनुसार स्मशानभूमी बांधण्यात आली. पिरवाडीला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली पंचायत समितीच्या 15 व्या वित्त आयोगाचा अनुसार साडेचार लाखांचा निधी या स्मशानभूमीसाठी वापरण्यात आला. त्यासाठी माजी सभापती सागर कडू आणि उपसभापती वैशाली पाटील यांचे योगदान आहे.
या कार्यक्रमासाठी तालुका चिटणीस विकास नाईक, खलापूर तालुका चिटणीस संतोष जंगम, नागावचे सरपंच चेतन गायकवाड, उपसरपंच भूपेंद्र घरत, पंचायत समिती सदस्य माया पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सीमा घरत, विभाग चिटणीस भारत राज थळी, शहर चिटणीस शेखर पाटील, जितेंद्र ठाकूर, विरेंद्र म्हात्रे, गजानन म्हात्रे, अनंत घरत, महेश म्हात्रे, सीताराम नाखवा, नयना पाटील, कमलाकर कडू, राजाराम कडू, जनार्दन थळी, नारायण पाटील, नागाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत राज थळी यांनी केले.