सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत होणार प्लास्टिक मुक्त

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गाव आणि वाड्या प्लास्टिक मुक्त होणार आहेत. ग्रामपंचायत, 5आर मुंबई व जिल्हा परिषदेच्या सहाय्याने जिल्ह्यातील हा पहिला पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची माहिती आणि नियोजनसाठी 21 गणपती सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम राबविण्याचे आश्‍वासन उपस्थित सर्व महिलांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. हा प्रकल्प जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प असू शकतो. याद्वारे संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त होऊन पर्यावरणाचे संरक्षण आणि कचरा व्यवस्थापन उत्तम प्रकारे घडेल असे डॉ. किरण पाटील म्हणाले. तसेच ग्रामपंचायतीच्या विविध कामाचे कौतुक केले. तसेच 5 आर संस्थेच्या स्मिता बिरकर यांनी कोणते व कसे प्लास्टिक गोळा करायचे ते बाहेर फेकल्याने त्याचे पर्यावरण, वन्य व पाळीव जनावरांवर होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली. शिवाय गोळा झालेलं प्लास्टिक अधिकृत पुनर्प्रक्रियेसाठी घेऊन जाण्याविषयी ग्रामपंचायत बरोबर नियोजन केले. याबरोबर पंचायत समिती सुधागड गटविकास अधिकारी विजय यादव, सरपंच उमेश यादव, स्वदेश फाउंडेशनचे पाटील, प्राइड इंडिया मोरे, रायगड प्रदूषण मंडळ कमिटी सदस्य प्रमोद राईलकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसेवक ए.टी.गोरड, शिक्षक रमाकांत शिंदे, लक्ष्मण चव्हान, 5 आरचे सच्छिदानंद चतुर्वेदी, सुशील बिरकर, मिचेल कपाडिया, पूजा भौड, ग्रामसंघ सीआरपी स्नेहा यादव, प्रची कदम, सचिन मुंढे, संध्या यादव, गणेश महाले आणि मनमुक्त फाउंडेशनचे प्रफुल सुतार यांनी विशेष मेहनत घेतली.

प्लॅस्टिक उचलण्याची जबाबदारी उचलली
ग्रामपंचायतीने सर्व घरातील प्लास्टिक जमा करण्याची जबाबदारी सुकन्या ग्रामसंघ व त्यामध्ये समाविष्ट असलेल्या 20 बचत गटांवर सोपवली आहे. ही जबाबदारी सामाजिक बांधिलकी समजून स्वीकारून पुढे योग्य पार पाडण्याची ग्वाही ग्रामसंघ अध्यक्षा प्राजक्ता यादव यांनी दिली. शिवाय पंचायत समिती उमेद अभियान प्रमुख अनुराधा गायकवाड यांनी हा उपक्रम तालुक्यात इतर ही ग्राम संघापर्यंत पोहोचवून राबवण्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version