रायगड जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर; जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार फेरतपासणीची मागणी
| अलिबाग | प्रमोद जाधव |
तलाठी संवर्गासाठी विभागीय दुय्यम सेवा परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मात्र, हा निकाल संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विभागीय दुय्यम सेवा परीक्षेच्या तपासणीत सावळागोंधळ झाल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, पेपरची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तलाठी म्हणून रूजू झाल्यावर वेतनवाढीसाठी दुय्यम सेवा परीक्षा देणे तलाठ्यांसाठी बंधनकारक असते. त्यानुसार तलाठी संवर्गासाठी दुय्यम सेवा विभागीय परीक्षा 26 व 27 डिसेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखालील रायगड जिल्ह्यातील तलाठी संवर्गासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा नियम, 1997 अन्वये जिल्हाधिकारी यांना परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली ही परीक्षा पार पडली. रायगड जिल्ह्यातील 39 तलाठ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. एकूण 200 मार्कांची लेखी परीक्षा होती. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शंभर गुण प्राप्त करणे आवश्यक होते. त्यानुसार तलाठी उमेदवारांनी आपल्या क्षमतेनुसार या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. एकूण 39 उमेदवारांपैकी 14 उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम संधीमध्ये दहा जण उत्तीर्ण झाले. सुट्टीचा फायदा घेऊन चार उमेदवार उत्तीर्ण झाले. तसेच 25 उमेदवार अनुत्तीर्ण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
परंतु, अनुत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी या परीक्षेच्या पेपर तपासणीवर आक्षेप घेतला आहे. या तपासणीवर संशय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. जे उमेदवार अधिकाऱ्यांच्या जवळचे आहेत, तसेच नातेवाईक आहेत, त्यांना या परीक्षेत जास्त गुण देऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. दुय्यम सेवा परीक्षेतील तपासणीबाबत नाराजीचे सूर उमटले आहेत.
दुय्यम सेवा परीक्षेतील पेपर तपासणी संशयास्पद आहे. 200, 180, 175 गुण मिळतील इतके प्रश्न सोडविले आहेत. तरीदेखील 35 ते 80, 95 असे गुण मिळाले आहे. त्यामुळे या पेपर तपासणीबाबत संशय निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी ही तपासणी पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
– परीक्षार्थी (नाव न सांगण्याच्या अटीवरून)
दुय्यम सेवा परीक्षा देणारे कर्मचारी असतात. त्यामुळे कोणावर कोणत्याही प्रकाराचा रोष ठेवून गुण कमी केले जात नाही. तसेच कोण ओळखीचा, नातेवाईक आहे, म्हणून गुण वाढविले जात नाहीत. नुकत्याच झालेल्या या परीक्षेच्या पेपरची तपासणी करण्यात आली. यावेळी उत्तरे योग्य नसल्याने गुण देणे कठीण झाले होते. त्यामुळे या परीक्षेत काही उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत.
– रवींद्र शेळके, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन