| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
डिजीटलायजेशनच्या माध्यमातून नागरीकांना दर्जेदार सुविधा देण्यावर सिडकोकडून भर दिला जात आहे. या माध्यमातून पारदर्शक कारभार तसेच आठवड्याच्या सातही दिवस नागरीकांना सुविधा देण्यासाठी व्यवसाय सुलभता केंद्र सुरू करण्यात आले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याहस्ते गुरुवारी या केंद्राचे लोकार्पण झाले. डिजिटलायजेशन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर उत्तम सेवा देणे, संवाद सुकर करणे आणि कामे सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व्यवसाय आणि संघटनेचे रूपांतरण करण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे डिजिटलायझेशनवर सिडकोने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यवसाय सुलभता केंद्र या संकल्पनेतून एक खिडकी निवारण, एकाच ठिकाणी सादरीकरण, मूल्यमापन आणि निवारण व नागरिककेंद्री प्रशासन, अशा सुविधा नागरीकांना मिळणार आहेत.
माहिती आणि संवादाद्वारे नागरिक आणि व्यवसायांना कार्यक्षम, सोईस्कर आणि पारदर्शक सेवा पुरविण्याकरिता शासनाचे रूपांतरण करण्याच्या दृष्टीने व्यवसाय सुलभता केंद्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. सिडकोतर्फे पुरविण्यात येणार्या सर्व सेवा या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात याकरिता नागरिकांसाठी वन स्टॉप आयटी विभाग असणार आहे. पोर्टल स्मार्ट प्रशासन पुरविण्यात येणार आहे. नागरिक आणि शासन यांच्यातील सुसंवाद वाढवला जाणार आहे. ही सेवा 24 तास सुरु राहणार आहे.
अशी मिळणार तत्काळ सेवा
या व्यवसाय सुलभता केंद्रातून वसाहत सेवा व्यवस्थापक शहर सेवा 64 दुय्यम सेवा, बांधकाम परवाना सेवा – 4 दुय्यम सेवा, अभियांत्रिकी सेवा -3 दुय्यम सेवा, सर्वसाधारण सेवा – 4 दुय्यम सेवा आणि नैना प्रकल्पासंदर्भातील सेवा – 4 दुय्यम सेवा या सेवांव्यतिरिक्त पोर्टलवर पारदर्शक पद्धत निर्माण करण्यात आली आहे. ज्याद्वारे सेवांची स्थिती व त्याकरिता संबंधित विभागाकडून लागणार वेळ जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळाद्वारे माहिती ज्ञापन मूल्यमापन करणे शक्य होणार असून विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार्या क्यूआर कोडद्वारे व्यवसाय वापरकर्त्यांना आवश्यक ती कागदपत्रे आणि निपटार्यासाठी लागणारा आवश्यक वेळ याबाबतची अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे.