दुय्यम प्रतीच्या मासळीचे भाव वधारले; खवय्यांकडून नाराजी व्यक्त
| उरण | वार्ताहर |
बदलत्या हवामानामुळे व समुद्रात वाढत्या प्रदूषणामुळे समुद्रात मासळी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे उरणच्या मासळी बाजारात घोळ, सुरमई, रावस, जिताडा यासारखी मासळी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यात बळा, बांगडा, कुपा, ढोमी यासारख्या बाजारात येणार्या दुय्यम प्रतीच्या मासळीचे भाव वधारल्याने खवय्ये नाराज झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उरण तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्या अनुषंगाने उरण तालुक्यात करंजा, मोरा, दिघोडे, खोपटे, आवरे, गोवठणे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी, कोप्रोली समु्द्रकिनार्यांच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छिमारीचा व्यवसाय केला जातो. एकट्या करंजा गावात 1100 मासेमारी नौका आहेत. मात्र, सततच्या हवामानातील बदलामुळे मासेमारी करणार्या व्यवसायिकांना आपापल्या नौका या किनार्यावर नांगरुन ठेवण्याची पाळी आली आहे. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे घोळ, रावस, जिताडा, सुरमई, हलवा, पापलेटसारखी मासळी मिळणे कठीण झाले आहे.
सध्या उरणच्या मासळी बाजारात घोळ, रावस, जिताडा, सुरमई, पापलेट या मासळीचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यात खवय्यांची संख्या बळावली आहे. त्यामुळे बांगडा, कुपा, ढोमी, बळा, मुशी, निवटी या दुय्यम प्रतीच्या मासळीला ही मागणी वाढली आहे.त्यामुळे मासे विक्रेत्यांनी दुय्यम प्रतीच्या मासळीचे भाव वाढवले असल्याने खवय्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.