आधीच शिक्षक कमी, त्यात प्रतिनियुक्ती

नियमित शिक्षक बजावतोय शिक्षणमंत्र्यांकडे सेवा; माहिती अधिकारात झाले उघड


| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्या रिक्तपदांवर काहीच दिवसांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेने 169 निवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या नियुक्त्या दिल्या आहेत. त्याचवेळी महाड तालुक्यातील शाळेवरील नियमित शिक्षकांची प्रतिनियुक्ती शिक्षणमंत्र्याच्या मागणीवरुन त्यांच्या कार्यालयात करण्यात आली आहे. सदरची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी माहिती अधिकारात उघड केली आहे.

सावंत यांना मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 27 सप्टेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून डॉ. महेंद्र गुणाजी शिर्के, शिक्षक प्राथमिक शाळा, कांबळे/बिरवाडी, ता.महाड यांची सेवा प्रतिनियुक्तीवर शिक्षणमंत्री यांच्या कार्यालयात वर्ग करण्यास फर्माविले. त्यानंतर मंत्रालयाच्या ग्रामविकास विभागानेही 30 नोव्हेंबर 2022 रोजी अशाच प्रकारचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार 09 डिसेंबर 2022 रोजी प्रतिनियुक्ती आदेश पारित करून शिक्षक डॉ.महेंद्र गुणाजी शिर्के यांची प्रतिनियुक्ती शिक्षणमंत्री यांच्या कार्यालयात करून त्यांना कार्यमुक्त केले, अशी माहिती सावंत यांना माहिती अधिकारामध्ये मिळाली आहे.

सार्वजनिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल नेहमी चिंता व्यक्त केली जात असते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. ही घटना उत्तरदायित्व आणि सार्वजनिक संसाधनांच्या बेजबाबदार वापराची आठवण करून देणारी आहे अशी टीका सावंत यांनी केली आहे. आधीच नियमित शिक्षकांची पदे रिक्त असताना असे प्रकार होत असतील, तर ते गंभीर आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्हा परिषदेचे किती कर्मचारी अशा प्रकारे मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत, त्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्रित करावी आणि या कर्मचाऱ्यांना मूळ ठिकाणी परत बोलविण्यात यावे अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे सदरचे प्रतिनियुक्तीचे आदेश काढले असून प्राथमिक शिक्षक डॉ.महेंद्र गुणाजी शिर्के हे शालेय शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत.

पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, राजिप
Exit mobile version