वेगवेगळ्या मत प्रवाहामुळे रखडपट्टी
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी नेरळ येथून मिनीट्रेन आणि घाट रस्ता असे दोनच मार्ग आहेत. मात्र, माथेरानमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग असावेत, अशी मागणी येथील स्थानिकांची आहे. परंतु, येथील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वेगवेगळे मत प्रवाह असल्यामुळे पर्यायी मार्गाचे भिजत घोंगडे असल्याची चर्चा जोर धरत आहे.
माथेरान हे मुंबई पासूनचे सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण असल्याने वर्षाला लाखो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य सरकारच्या नगरविकास विभाग यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प साकारले जात आहेत. मात्र, धूळ विरहित रस्त्यांचा प्रश्न स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. त्यावर उपाययोजना होत नाहीत. तसेच, सातत्याने पर्यायी मार्गाचे विषय पुढे करून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना खीळ घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे माथेरानमध्ये येण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांची मागणी सातत्याने होत आहे. त्यातून पर्यटन वाढीचे आणि त्यामुळे व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी कर्जत-कल्याण मार्गावरील भूतीवली गावापासून गार्बेट आणि पुढे माथेरान शहरातील माधवजी गार्डन असा रोपवे प्रस्ताव पुढे आणला होता. या रोपवेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी सकारात्मक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 20 वर्षाचा काळ लोटला तरी रोपवे होत नाही. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते नितीन सावंत यांच्याकडून ब्रिटिश माथेरानमध्ये प्रथम ज्या रस्त्याने आले तो काटवन ते माथेरान असा शिवाजी ग्लॅडर पर्यायी रस्ता होण्यासाठी शासन दरबारी कागदपत्र व्यवहार केला आहे.
तसेच, मनोज खेडकर हे नगराध्यक्ष असताना त्यांनी धोधानी ते सनसेट पॉइंट फीनॅक्युलर रेल्वे व्हावी असे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सर्व्हे करण्यात आला होता. हा प्रश्न देखील पुढे गेलेला नाही. माथेरानमधील भारतीय जनता पक्ष यांच्याकडून दिल्लीपर्यंत वार्या करण्यात आल्या असून धोधानी ते माथेरान असा पर्यायी रस्ता होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
सध्या नेरळ-माथेरान अशा रेल्वेच्या दोन फेर्या सुरू आहेत. परंतु, नेरळ पासून माथेरानला येई पर्यंत या मिनीट्रेनला अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे पर्यटकांसाठी हा कंटाळवाणा प्रवास ठरत आहे. त्यामुळे मिनी ट्रेनचा प्रवास वेगवान व्हावा, तसेच दिवसाला किमान चार गाड्या आणि रात्रीची वस्तीची गाडी पुन्हा सुरू व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांचा प्रयत्न होता. त्याचवेळी शटल सेवेच्या प्रवासी डब्यांमध्ये वाढ करावी, अशी देखील मागणी सातत्याने होत आहे. असे अनेक प्रश्न असताना माथेरानकर मागणी करीत असलेल्या पर्यायी मार्गांपैकी कोणताही एक पर्याय एकमताने निवडला जात नसल्याने पर्यायी मार्गाचे धोंगडे भिजत पडले आहे.