। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असणार्या चिर्ले ते दिघोडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने त्याठिकाणी जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे छोट्या वाहनचालकांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अटल सेतूवरुन मुंबई-कोकणाकडे जाणार्या या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
उरण परिसरातील विद्यार्थी आणि नोकरीनिमित्ताने प्रवास करणार्या चाकरमानी नेहमी दिघोडे-चिर्ले या रस्त्याचा वापर करत आहेत. तसेच, मुंबईकडून अटल सेतूवरुन कोकणाकडे जाणारे पर्यटक, चाकरमानी हे ही दिघोडे-चिर्ले या रस्त्यावरून प्रवास करत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असून हे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर धुळकण हवेत उडत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे. तरी अटल सेतू वरुन मुंबई-कोकणाकडे जाणार्या या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
उरण शहर तसेच मुंबई, नवीमुंबई शहराला जोडणारा चिर्ले ते दिघोडे हा महत्त्वाचा रस्ता आहे. अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. त्यात रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने या रस्त्यावर खड्डे पडले असून धुळकण हवेत उडत आहेत. यातून मार्गक्रमण करणार्या छोट्या वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी अटल सेतूसाठी महत्वाचा असलेल्या या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घ्यावे.
रवि घरत,
सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते, जेएनपीए-उरण